Home Breaking News मराठा साम्राज्याचा अमूल्य ठेवा महाराष्ट्रात परतणार : राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक...

मराठा साम्राज्याचा अमूल्य ठेवा महाराष्ट्रात परतणार : राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार राज्य सरकारच्या ताब्यात

लंडन | आपल्या मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक मौलिक आणि अभिमानास्पद वस्तू — नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार — अखेर राज्य सरकारच्या अधिकृत ताब्यात आली आहे. २९ एप्रिल रोजी लिलावातून ही तलवार राज्य सरकारने खरेदी केली होती. काही तांत्रिक कारणास्तव खरेदी प्रक्रिया मध्यस्थामार्फत पूर्ण झाली होती, परंतु आज लंडनमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून या ऐतिहासिक वारशाचा प्रत्यक्ष ताबा घेतला.
इतिहासाची पुनर्भेट
छत्रपती शाहू महाराजांनी ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी बहाल केलेले राजे रघुजी भोसले यांनी बंगाल, ओडिशा, आणि दक्षिण भारतापर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार घडवून आणला. अनेक युद्धमोहीमांमधून त्यांनी साम्राज्याचा लष्करी व राजकीय दबदबा निर्माण केला. त्यांची तलवार ही केवळ युद्धाची निशाणी नसून मराठा शौर्य, परंपरा आणि कलाकौशल्याचा सजीव पुरावा आहे.
तलवारीची वैशिष्ट्ये
ही तलवार मराठा शैलीत तयार झालेली असून फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम आणि युरोपियन बनावटीचे पाते ही तिची खास वैशिष्ट्ये आहेत. पात्याच्या पाठीवर तळाशी सोन्याच्या पाण्याने लिहिलेले — ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ — हे तिचे ऐतिहासिक वैभव अधोरेखित करते.
हरवून पुन्हा मिळालेला ठेवा
इतिहासतज्ज्ञांच्या मते, १८१७ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने नागपूरातील भोसल्यांचा खजिना लुटला, त्यात ही तलवार नेली गेली असावी. सुमारे दोन शतकांनी हा अमूल्य ठेवा पुन्हा आपल्या मातीत परतण्याच्या मार्गावर आहे.
अभिनंदन आणि कृतज्ञता
मुख्यमंत्री व राज्य सरकारने या खरेदीसाठी घेतलेली पुढाकार, तसेच मंत्री आशीष शेलार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अथक प्रयत्न, यामुळे मराठा इतिहासातील हे प्रतीक महाराष्ट्राच्या कायमस्वरूपी ताब्यात येणार आहे. लवकरच ही तलवार महाराष्ट्रात आणली जाईल आणि राज्यातील नागरिकांना ती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळेल.
“इतिहासाची वस्तू ही केवळ धातूची नाही, ती आपल्या अस्मितेची, अभिमानाची आणि परंपरेची प्रतिमा असते.”