पुणे – शहरातील लक्ष्मी रोड परिसरात घडलेल्या मोबाईल हिसकावण्याच्या गंभीर घटनेचा अखेर उलगडा झाला असून, विश्रामबाग पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
घटना ३० जुलै २०२५ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी नेहमीप्रमाणे मुळचंद दुकान, लक्ष्मी रोड येथे स्वीट कॉर्न विक्रीचे काम करून घरी जात असताना ते आपल्या आईशी फोनवर बोलत होते. याचवेळी अॅक्सेस १२५ स्कुटरवरून आलेल्या तिघा तरुणांनी त्यांच्या डाव्या बाजूने येत, अचानक मागून जोरात गाडी जवळ नेली आणि मागे बसलेल्या लाल जॅकेट घातलेल्या इसमाने फिर्यादींच्या कानाला असलेला सॅमसंग गॅलेक्सी A35 मोबाईल हिसकावून नेला. या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. तपासादरम्यान गोपनीय बातमीदारांच्या माहितीवरून आरोपी खडक परिसरात असल्याचे समजले. पोलिसांनी छापा टाकून रियान मुझम्मील खान (१९), आयान जावेद शेख (१९) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.
आरोपींकडून १०,००० रुपये किंमतीचा चोरी गेलेला मोबाईल आणि २५,००० रुपये किंमतीची सुझुकी अॅक्सेस मोपेड असा एकूण ३५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना ९ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या कारवाईत अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जलद गतीने तपास पूर्ण केला. या कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पांडुरंग वाघमारे, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, अर्जुन थोरात, नितीन बाबर, सागर मोरे यांनी मोलाची भूमिका बजावली.
ही कारवाई पुणे पोलिसांच्या दक्षतेचे आणि तात्काळ प्रतिसाद क्षमतेचे उत्तम उदाहरण ठरली असून, अशा गुन्हेगारांना शहरात थारा नाही, असा स्पष्ट संदेश यातून नागरिकांना देण्यात आला आहे.