चीनच्या लष्कराने (People’s Liberation Army – PLA) युद्धतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक धक्कादायक पाऊल टाकले असून, त्यांनी आता लांडग्याच्या रुपातील एक घातक रोबोट आपल्या पथकात समाविष्ट केला आहे. या आधुनिक यंत्रमानवाची क्षमताच अशी आहे की ती ऐकूनच कोणत्याही देशाच्या लष्कराच्या गोटात भीतीचे वातावरण निर्माण होईल.
मंगळवारी झालेल्या एका युद्धसरावामध्ये, चिनी सैन्याने या ‘रोबोटिक वुल्फ’सह आपला सराव केला. विशेष म्हणजे, एका मिनिटात तब्बल ६० गोळ्या झाडण्याची क्षमता या यंत्रलांडग्याकडे आहे – म्हणजेच एका सेकंदाला एक गोळी. हा लांडगा नुसता फिरणारा रोबोट नाही, तर अत्यंत अचूक निशाणा आणि गतिमान हालचालींसह सज्ज असलेली ‘मोबाईल मशीन गन’च म्हणावी लागेल.
ग्लोबल टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, हा रोबोट बर्फाळ भाग, खडकाळ डोंगराळ परिसरात अगदी सहजतेने चालतो आणि आपले लक्ष्य अचूकपणे भेदतो. उंच डोंगर, अडथळे, मानवी प्रवेश न होणारे दुर्गम भाग – जिथे सैनिक पोहोचणं शक्य नाही, तिथे हा ‘मेकॅनिकल वुल्फ’ सहज घुसून शत्रूंना नामोहरम करू शकतो.
हे रोबोट केवळ हल्ल्याच्या उद्देशानेच नव्हे, तर टेहळणी, माहिती गोळा करणे, आणि अत्यंत गुप्त मोहिमांमध्येही उपयोगी पडू शकतात. युद्धभूमीवर मानवी हस्तक्षेप कमी करून अधिक नुकसानकारक आणि यांत्रिकतेवर आधारित युद्धे खेळली जातील, अशी भीती यामुळे वाटू लागली आहे.
भारतातील संरक्षणतज्ज्ञांच्या मते, “या प्रकारच्या यंत्रशस्त्रांचा सामना करण्यासाठी तितक्याच प्रगत आणि अचूक तंत्रज्ञानाची गरज आहे. भारतालाही आता या दिशेने पावले उचलावी लागतील.”
चीनने या लांडग्यासारख्या रोबोटिक यंत्रांचा विकास करणे म्हणजे भविष्यातील युद्धांची दिशा ठरवण्याचा इशारा मानला जात आहे. हे केवळ सुरुवात आहे, अशी शक्यता असून, भविष्यात ड्रोन, रोबो डॉग, स्वायत्त रणगाडे यांचा देखील मोठ्या प्रमाणात लष्करी वापर वाढू शकतो.
हे रोबोटिक लांडगे काय करू शकतात?
एका सेकंदाला एक गोळी झाडण्याची क्षमता
बर्फ, डोंगर, खडकाळ भागांतून सहज हालचाल
मानवी सैनिक जिथे पोहोचू शकत नाहीत तिथे कार्यक्षमता
गुप्त हल्ले, टेहळणी आणि लक्ष्य नष्ट करण्यासाठी वापर
भारतीय लष्कराला इशारा
चीनचा हा पाऊल भारतासारख्या शेजारी देशांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. अशा यंत्रांचा प्रतिकार करण्यासाठी भारताला उच्चस्तरीय रोबोटिक्स, AI आणि डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागणार आहे.