पुणे, ६ ऑगस्ट २०२५ – पुणे महापालिकेत आज एका धक्कादायक प्रकारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या कार्यालयात धडक दिली. चालू बैठकीतच आयुक्तांवर आरडाओरडा करत “मराठीत बोला, नाहीतर घरी येऊन ठोको!” अशी थेट धमकी दिल्याचा आरोप शिंदे यांच्यावर आहे.
ही घटना आयुक्तांच्या कार्यालयात घडली, जेव्हा स्वच्छता मोहीम संदर्भात एक बैठक सुरू होती. या दरम्यान शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांना थांबून घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र ते धीर न सोडता थेट बैठकीच्या खोलीत घुसले आणि आयुक्तांशी वाद घालू लागले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्तांनी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हिंदीमध्ये बाहेर जाण्यास सांगितले, यामुळे शिंदे संतप्त झाले. त्यांनी जोरदार आवाजात म्हणाले, “तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठीत बोला! नाहीतर आम्ही तुम्हाला बाहेर काढू. घरात येऊन ठोकू.”
या गोंधळामुळे बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. शिंदे आयुक्तांच्या दिशेने धावले, मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता असून, या वादामुळे PMC प्रशासन आणि राजकीय पक्षांमध्ये तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
राजकीय व सामाजिक पटलावर प्रतिक्रिया
या प्रकारावर नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनिक अधिकार्यांवर अशा प्रकारचा दबाव आणणे हे लोकशाहीला धरुन नाही, असे अनेकांनी म्हटले आहे. तर काहींचे म्हणणे आहे की, मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिचा सन्मान केला पाहिजे.
दरम्यान, PMC प्रशासनाकडून याबाबत तक्रार दाखल होणार की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, या घटनेनंतर महापालिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.