पुणे | प्रतिनिधी :- मानाचा चौथा गणपती म्हणून ओळख असलेल्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त, पुण्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५६१ युवक-युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करत सामाजिक जाणीवेचा आदर्श घालून दिला.
रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नु. म. वि. शाळा, बाजीराव रोड, पुणे येथे हे शिबिर पार पडले. या उपक्रमास पुण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळ, ढोलताशा पथकं आणि सामाजिक संस्थांचा भरभरून सहभाग मिळाला.
कार्यक्रमास कसब्याचे आमदार श्री हेमंतभाऊ रासने, भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री धीरज घाटे, मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले.
तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या शिबिरात तरुणांसोबत तरुणींनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रक्तदान करताना सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच सामाजिक समाधानाची झळक जाणवली.
ढोल-ताशा पथकांची भक्कम साथ
शिबिरात रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, स्वरुपवर्धिनी, श्री गजलक्ष्मी, शिवमुद्रा, गजर प्रतिष्ठान, स्वराज्य ट्रस्ट, उगम प्रतिष्ठान, तालगर्जना, मैत्री वेलफेअर फाउंडेशन, समर्थ प्रतिष्ठान, नादब्रम्ह ट्रस्ट या ढोल ताशा पथकांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या सक्रिय उपस्थितीमुळे वातावरण अधिक प्रेरणादायी बनले.
मंडळाचा सक्रिय सहभाग
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री विकासजी पवार, उपाध्यक्ष श्री विनायकजी कदम, कोषाध्यक्ष श्री नितीनजी पंडित, स्वागताध्यक्ष श्री कृष्णकुमार गोयल आणि इतर सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
या सामाजिक उपक्रमामुळे गणेशोत्सव मंडळांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आला असून, उत्सवाबरोबरच समाजोपयोगी कार्य कसे करता येते, याचा उत्तम आदर्श या शिबिराने उभा केला आहे.