Home Breaking News चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ‘UNCLOG Chakan MIDC’ मोहिमेला गती; औद्योगिक...

चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ‘UNCLOG Chakan MIDC’ मोहिमेला गती; औद्योगिक प्रतिनिधींचा निर्धार

105
0
चाकण औद्योगिक पट्टयातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि या परिसराला कोंडीमुक्त करण्यासाठी ‘UNCLOG Chakan MIDC’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला उद्योग जगताच्या विविध संघटनांचा सक्रिय पाठिंबा असून, राज्य सरकारदरबारी भोसरीप्रमाणेच चाकण समस्यामुक्त होण्यासाठीही ठोस पावले उचलली जात आहेत.
या मोहिमेच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्याचे नियोजन असून, त्यात चाकण औद्योगिक पट्टयातील विविध वाहतूक अडचणी, अतिक्रमण, रस्ते रुंदीकरण, भूसंपादन, पार्किंग व्यवस्था आणि स्पायसर चौकाच्या कामांची अंमलबजावणी आदी मुद्द्यांवर ठोस चर्चा होणार आहे.
औद्योगिक क्षेत्रातील चाकण इंडस्ट्रिअल फेडरेशन, चाकण इंडस्ट्रिअल असोसिएशन, चाकण एमआयडीसी इंडस्ट्रिअल असोसिएशन आणि ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समिती या प्रमुख संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. श्री. दिलीप बटवाल, श्री. सुधीर मित्तल, श्री. जयदेव अक्कलकोटे, श्री. अतुल इनामदार, श्री. प्रशांत टोपे यांच्यासह अनेक उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत चाकणच्या समस्यांचे तांत्रिक आणि धोरणात्मक विश्लेषण केले.
बैठकीत पुढील महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले:
भूसंपादन आणि रस्ता रुंदीकरणासाठी तातडीने निधी मिळावा
अतिक्रमण हटवण्यासाठी MIDC आणि प्रशासनाची समन्वयात्मक भूमिका
स्पायसर चौकाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले करणे
मिसिंग लिंक रस्त्यांची कामे पूर्ण करणे
MSEB चे पोल हटवून रस्ते मोकळे करणे
अवजड वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन तयार करणे
रेड स्पॉट्स ओळखून त्या ठिकाणी खास ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करणे
‘Single Point Authority’ ची नियुक्ती करून चाकण MIDC साठी वेगळी समन्वय यंत्रणा स्थापन करणे
चाकण हा भारतातील एक महत्त्वाचा औद्योगिक केंद्रबिंदू असून येथे देश-विदेशातील नामांकित कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था सुधारणे ही काळाची गरज बनली आहे. ही मोहीम केवळ घोषणांपुरती न राहता प्रत्यक्ष कृतीच्या दिशेने पुढे जात आहे, हे विशेष.