माथेरान | निसर्गरम्य माथेरानमधील प्रसिद्ध इको पॉइंटजवळील लँडस्केप पॉइंटच्या 150 ते 200 फूट खोल दरीत अडकलेल्या एका भटक्या कुत्र्याला तब्बल दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर अखेर सोमवारी संध्याकाळी सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही अत्यंत धाडसी व संवेदनशील मोहिम ‘सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संघटनेच्या’ बचाव पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.
कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न
सह्याद्री मित्र संघटनेच्या स्वयंसेवकांनी सहनशीलता, धाडस आणि संयम यांचे उदाहरण घालून दिले. कुत्रा खोल दरीत पडल्याची माहिती मिळताच तुरित बचाव कार्य सुरू करण्यात आले. अन्न-पाणी न मिळाल्यामुळे तो थकून गेला होता, पण मदत पोहोचल्यावर त्याचीही साथ दिली.
दोरांच्या साह्याने धाडसी उतरण आणि बचाव
सह्याद्री मित्र पथकातील सदस्यांनी रिस्क घेत दोरांच्या साहाय्याने दरीत उतरत कुत्र्यापर्यंत पोहोचले. ही कारवाई केवळ तांत्रिक कसब नव्हे, तर प्राणीप्रेमाची आणि सामाजिक जबाबदारीची साक्ष देणारी होती.
घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, सह्याद्री मित्र आपत्कालीन पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक प्रशासन, वनविभाग आणि प्राणीप्रेमींनीही या कार्याचे अभिनंदन केले.
माणुसकीचं आणि संवेदनशीलतेचं जिवंत उदाहरण
या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, प्रत्येक जीव महत्त्वाचा असतो. माणसांसाठीच नव्हे तर प्राण्यांसाठी देखील संकटसमयी धावून जाणारी तळमळ आजही जिवंत आहे.
प्रशासनाकडून पथकाचा गौरव होणार?
स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी या पथकाला सन्मानित करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. लवकरच सह्याद्री मित्र पथकाला अधिकृत गौरव मिळण्याची शक्यता आहे.