पुणे शहरात पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या धडक कारवाईने अवैध दारू धंदे करणाऱ्यांना जोरदार हादरा दिला आहे. परिमंडळ ४ मधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील डोंगराळ आणि नदी परिसरात लपूनछपून हातभट्टी दारू तयार करून तिची विक्री करणाऱ्या टोळ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात मासरेड राबवून १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले.
दिनांक १९ जुलै २०२५ रोजी शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेत एकूण १४ आरोपींवर १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईत २९४ लिटर हातभट्टी दारू, ११.३४० लिटर देशी दारू, तसेच इतर साहित्य असा एकूण ३४,१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील २९,४०० रुपयांहून अधिक किंमतीची हातभट्टी दारू नष्टही करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त परिमंडळ ४ चे मा.श्री. सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली पार पडली. पुणे शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत ३१ पोलीस अधिकारी आणि ८० पोलीस अंमलदारांची विशेष पथके तयार करण्यात आली होती.
पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली येरवडा व खडकी विभागातील सहायक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे आणि श्री. विठ्ठल दबडे, तसेच अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार ही कारवाई अत्यंत नियोजनपूर्वक पार पडली.
या मोहिमेमुळे अवैध मद्य व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, शहरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा देणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अवैध कारवायांना थारा दिला जाणार नाही.