उधमपूर (जम्मू-कश्मीर) : अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत भीषण अपघात उधमपूर जिल्ह्यातील बट्टल बल्लियां परिसरात घडला. आज सकाळी 6 वाजून 13 मिनिटांच्या सुमारास एक ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली. कारमध्ये आठ यात्रेकरू प्रवास करत होते. या भीषण अपघातात पाच यात्रेकरू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तात्काळ रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सीआरपीएफच्या 137 बटालियनचे अधिकारी करतार सिंह यांनी सांगितले की, जखमी यात्रेकरूंची प्रकृती सध्या स्थिर असून सर्वांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. अपघातग्रस्त कार ही पंजाब येथील असून ट्रक उत्तर प्रदेशातून आलेला होता.
ही घटना पुन्हा एकदा अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणते. प्रशासनाकडून वारंवार सुरक्षा आणि वाहतुकीसंबंधी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही अशा घटना घडत असल्याने यात्रेतील भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, जोरदार पावसामुळे गुरुवारी काही वेळासाठी स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा पुन्हा शुक्रवारी सुरू करण्यात आली आहे. नुनवान आणि बालटाल या आधार छावण्यांतून भाविकांचा नवीन जत्था पवित्र अमरनाथ गुंफेकडे रवाना झाला आहे.
गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत भूस्खलन व दगड कोसळण्याचे प्रकार घडले होते. यामुळे प्रशासनाने यात्रा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला होता. 3 जुलैपासून सुरू झालेल्या यात्रेत आतापर्यंत 2.50 लाखांहून अधिक भाविकांनी बर्फानी बाबा अमरनाथाचे दर्शन घेतले आहे.