पुणे | ११ जुलै २०२५ – पुणे शहरात मौजमजा करण्यासाठी चक्क महागड्या मोटरसायकली चोरून त्या ऑनलाईन मार्केटप्लेसवर खोट्या कारणांनी विकणाऱ्या एका युवकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने अत्यंत कौशल्याने पार पाडली असून, आरोपीकडून सुमारे ८.४० लाख रुपये किंमतीच्या १४ दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
आरोपीचा तपशील:
नाव: महादेव शिवाजी गरड (वय २६ वर्षे)
सध्या राहणार: समर्थ कृपा बिल्डिंग, मांजरी बुडा, पुणे
मुळ गाव: अंबुलगा, ता. चाकूर, जि. लातूर
शिक्षण: पदवीधर
गुन्ह्यांची माहिती व कारवाई:
दि. २ जुलै रोजी पो.उपनिरीक्षक अभिजीत पवार आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. संशयित महादेव गरड यास ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याच्याकडून Honda Shine (MH-15/GH/9148) व Honda Unicorn (MH-99/CT/2914) या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
तपास अधिक खोलात गेल्यावर, त्याने फेसबुक मार्केटप्लेसचा वापर करून वाहनांचे हफ्ते थकले असून फायनान्स कंपनीने वाहन ताब्यात घेतल्याचे सांगून ते वाहन खरेदीदारांना विकल्याचे उघड झाले.
१४ गाड्यांचा तपशील:
तपासादरम्यान त्याच्याकडून पुढील १२ युनिकॉर्न दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, यातील चोरीचे गुन्हे पुणे व पिंपरी चिंचवडमधील ४ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होते.
संबंधित पोलीस स्टेशन व गुन्ह्यांची संख्या:
हडपसर पोलीस स्टेशन – ६ गुन्हे
काळेपडळ पोलीस स्टेशन – ३ गुन्हे
चिखली पोलीस स्टेशन (PCMC) – २ गुन्हे
सांगवी पोलीस स्टेशन (PCMC) – ३ गुन्हे
पोलिसांकडून माहिती:
आरोपीने कबुल केलं की, मौजमजा करण्यासाठी पैशांची गरज भासल्याने त्याने हा गुन्हेगारी मार्ग स्वीकारला. दुचाकी चोरी करून त्या सोशल मीडियावर बनावट माहिती देऊन विक्री केल्या जात होत्या.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी:
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय पतंगे व पो.उनि. अभिजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.