पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पालखी सोहळा २०२५’ मध्ये, सेवाभावी संस्थांनी दिलेल्या योगदानाचे मोठे कौतुक करण्यात आले. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य तपासणी शिबिरे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियंत्रण व जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य करून या संस्थांनी वारकरी सेवेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
या निमित्ताने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ११ सेवाभावी संस्थांना सन्मानपत्र आणि संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, सहआयुक्त मनोज लोणकर, नगरसचिव मुकेश कोळप, उपआयुक्त सचिन पवार, व इतर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेखर सिंह यांनी यावेळी म्हटले, “या संस्थांचे कार्य फक्त वारीपुरते मर्यादित न राहता समाजपरिवर्तनाचे द्योतक ठरले आहे. भविष्यातील वारी अधिक प्रभावी, शिस्तबद्ध व पर्यावरणपूरक व्हावी यासाठी त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरेल.” कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
गौरवप्राप्त संस्थांची यादी पुढीलप्रमाणे: ✅ निर्मल वारी आकुर्डी (मिलिंद वाघ) ✅ संत निरंकारी क्षेत्र, पिंपरी (किशनलाल अडवाणी) ✅ डब्ल्यूटीई कंपनी (अशोक कुलकर्णी) ✅ संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र (मोहन गायकवाड) ✅ श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवडगाव ✅ पिं.चिं. संस्था (पूनम परदेशी) ✅ पिंपळवन निसर्ग संवर्धन ✅ नंदनवन कुष्ठपीडित बहुउद्देशीय संस्था (अनिल कांबळे) ✅ गुणवंत कामगार कल्याण मंडळ (बाबासाहेब साळुंखे, नंदकुमार धुमाळ) ✅ संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, भोसरी (अंगद जाधव) ✅ व्हीएसएल फाउंडेशन दिघी (समाधान बोरकर, केशव वाघमारे)
या संस्थांनी ज्या निष्ठेने सेवा बजावली, ती इतर सामाजिक संघटनांसाठी प्रेरणादायी आहे. वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या वारीमध्ये सामाजिक बांधिलकीने सज्ज झालेल्या या संस्थांचे कौतुक सर्वत्र होत आहे.