कोंढवा, पुणे – पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरीच्या घटनांनी चिंता वाढवली असतानाच, कोंढवा पोलिसांनी वाहनचोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना मध्यरात्री सापळा रचून ताब्यात घेतलं. या दोघांकडून एक रिक्षा आणि सात दुचाकी वाहने असा एकूण २.३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोंढवा पोलिसांची गुप्त माहितीवरून शक्कल – खडीमशिन चौकात सापळा रचून चोरटे गजाआड

Z1Cदिनांक ३० जून २०२५ रोजी लक्ष्मीनगर, कोंढवा येथे एका नागरिकाची ४०,०००/- रुपये किमतीची बजाज कंपनीची रिक्षा चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान, पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रल्हाद ईखे आणि गजानन उर्फ राज खटपटे या दोघांनी सदर चोरी केली असून, ते खडीमशिन चौकाजवळ रिक्षासह थांबले आहेत.
सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव आणि त्यांच्या तपास पथकाने तत्काळ सापळा रचून आरोपींना अटक केली.
८ गुन्ह्यांचा उलगडा, पुणे ग्रामीणपासून लष्करपर्यंत पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल
आरोपींच्या विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन येथे ५, लष्कर येथे १, खराडी येथे १ आणि भोर पोलीस स्टेशन येथे १ अशा एकूण ८ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या ताब्यातून एक रिक्षा आणि सात चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, एकूण मुद्देमालाची किंमत ₹२,३५,०००/- इतकी आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पोलिसांची संघटीत कामगिरी
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व) मा. श्री. मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहा. आयुक्त श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, गुन्हे निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव व त्यांच्या तपास पथकातील १८ हून अधिक पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला.
पुणे पोलिसांचे आवाहन – नागरिकांनी वाहन पार्क करताना सतर्क राहावे, सीसीटीव्हीचा लाभ घ्यावा
पोलिसांनी नागरिकांना वाहने सुरक्षित पार्क करण्याचे व शक्य असल्यास जीपीएस किंवा सीसीटीव्हीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या सततच्या गस्त आणि तपासामुळे अशा प्रकारचे गुन्हे रोखता येऊ शकतात.




