पुणे शहरातील वाघोली पोलीस स्टेशनच्या कार्यकुशल तपासातून अट्टल सोनसाखळी चोरट्याला अखेर जेरबंद करण्यात आले. दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी मौजे केसनंद, थेऊर रोडवरील पाटील वस्ती येथे गणेश किराणा स्टोअरमध्ये घडलेल्या सोनसाखळी चोरीप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

घटनेच्या दिवशी दोन अनोळखी इसम मोटारसायकलवरून किराणा दुकानात आले. त्यातील एकाने दुकानात बिस्किटे आणि चॉकलेट मागण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याशी संवाद साधला व संधी साधून त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे मिनी सोन्याचे गंठण हिसकावून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
या घटनेबाबत वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ११५/२०२५, भा.दं.वि. कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पो.उपनि. वैजिनाथ केदार आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने संशयित आरोपीचा माग काढला.
तपासादरम्यान आरोपी मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८, रा. लिंबोडी, देवीनिमगाव, ता. आष्टी, जि. बीड) याला अटक करण्यात आली. आरोपीकडून तब्बल १,००,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस अंमलदार महादेव कुंभार, संतोष शेरखाने, मारुती वाघमारे, अमोल सरतापे, गहिणीनाथ बोयणे आणि तांत्रिक विश्लेषणासाठी अंमलदार विशाल गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ श्री. सोमय मुंडे आणि मा. सहा. पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांचे सतर्क आणि जलद हालचालीमुळे या गुन्ह्याचा यशस्वी छडा लागला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.




