Home Breaking News सोन्याच्या दुकानात जबरी चोरी करणारे ३ आरोपी व १ बालक जेरबंद! सिंहगड...

सोन्याच्या दुकानात जबरी चोरी करणारे ३ आरोपी व १ बालक जेरबंद! सिंहगड रोड पोलीसांची धडाकेबाज कारवाई; ४.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे | वडगाव बुद्रुक परिसरातील गजानन ज्वेलर्स या सराफ दुकानात भरदिवसा हल्ला करून ४.५० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या तीन आरोपींसह एका विधी संघर्षित बालकास सिंहगड रोड पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक केली आहे. ही धक्कादायक घटना १ जुलै २०२५ रोजी घडली होती. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दुपारी दुकानात घुसून हल्ला, महिला जखमी

वडगाव बुद्रुकमधील रेणुकानगरीतील गजानन ज्वेलर्स या सराफ दुकानात अनोळखी चार चोरट्यांनी दुपारी अचानक प्रवेश केला. दुकान चालवत असलेल्या महिलेला लोखंडी हत्याराने डोक्यात व हातावर गंभीर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर दुकानातील कपाट फोडून, ४.५ लाख किमतीचे सुमारे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले.

हत्यारांनी दहशत माजवत आरोपी पसार

दरोडेखोरांनी हातात पिस्तूल व लोखंडी सळी दाखवून नागरिकांमध्ये भीती पसरवत तेथून पलायन केले. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात IPC 311, 3(5), आर्म्स अ‍ॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहितीच्या आधारे तपास

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्हे शाखा युनिट ३, नांदेड सिटी डिबी पथक व सिंहगड रोड पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवली. विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन त्याच्या कबुलीनुसार उर्वरित ३ आरोपींना अहमदनगरहून अटक करण्यात आली.

मुद्देमाल आणि चोरीस वापरलेली मोटारसायकल हस्तगत

पोलिसांनी खालील मुद्देमाल हस्तगत केला :

१५ ग्रॅम सोन्याची चैन – ₹१,३५,०००

१० ग्रॅम सोन्याची चैन – ₹९०,०००

५ ग्रॅमच्या ३ चैन – ₹१,३५,०००

१० ग्रॅमचा नेकलेस – ₹९०,०००

शाईन मोटारसायकल

 एकूण ₹४,५०,०००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात!

पोलीस दलाची संगनमतातून यशस्वी कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन शर्मा, आणि गुन्हे शाखेचे प्रमुख पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट ३, खंडणी विरोधी पथक, नांदेड सिटी पोलिस स्टेशन, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि विशेष पोलीस पथकांनी समन्वय साधून ही कामगिरी उभी केली.

पोलीस प्रशासनाकडून आवाहन

“पुण्यातील नागरिकांनी आपल्या परिसरात संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. या यशस्वी कारवाईमुळे सराफ व्यापाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला असून पुणे पोलिस कोणत्याही गुन्हेगारीला बिनधास्त व कठोर प्रत्युत्तर देईल” — पोलीस अधिकारी