पुण्यात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय! आणखी ५ नवीन सायबर पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव; पोलीस दलात एक हजार अधिक कर्मचाऱ्यांची भरती आवश्यक – आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती
पुणे शहरात सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाच, पुणे पोलीस दलाने मोठा निर्णय घेत आणखी पाच नवीन सायबर पोलीस ठाण्यांची मागणी केली आहे. सध्या शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यावर प्रचंड तक्रारींचा भार असल्यामुळे, नागरिकांची तक्रार नोंदवण्याची व तपासाची प्रक्रिया संथ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे औपचारिक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
सायबर गुन्हेगारी वाढीचा आढावा – सायबर पोलीस ठाण्यात दररोज १०० ते १५० तक्रारी दाखल होत आहेत. ऑनलाइन फसवणूक, लिंक क्लिक करून बँक खाती रिकामी करणे, खोट्या वेबसाईटद्वारे आर्थिक गंडा घालणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या गुन्ह्यांच्या तातडीने तपासासाठी स्वतंत्र व तांत्रिकदृष्ट्या सक्षम यंत्रणा उभी करणं अत्यावश्यक झालं आहे.
पायाभूत सुविधांसह पोलीस भरतीची मागणी – या पाच सायबर पोलीस ठाण्यांसाठी केवळ इमारतीच नव्हे, तर विशेष तांत्रिक यंत्रणा, प्रशिक्षित पोलीस अधिकारी, सायबर तज्ज्ञ, आणि डेटा अॅनालिस्टची गरज असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, या यंत्रणेसाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सात नवीन पोलीस ठाण्यांची यशस्वी अंमलबजावणी – पुणे शहराच्या वाढत्या विस्तारामुळे सात नवीन पोलीस ठाण्यांची स्थापना यापूर्वीच करण्यात आली आहे. लोणीकंद व लोणी काळभोर हे दोन पोलीस ठाणे ग्रामीण हद्दीतून पुणे शहर पोलीस दलात समाविष्ट करण्यात आले असून, नवीन पोलीस हद्दींसाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे.
१६०० पोलिसांची गरज, ८०० मिळाले, आणखी १००० कर्मचाऱ्यांची मागणी – शहरातील वाढती लोकसंख्या, वाढते अपघात, गुन्हेगारी आणि सायबर फसवणुकीचा वेग लक्षात घेता, एकूण १६०० पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. सध्या ८०० कर्मचारी मंजूर झाले असले तरी, अजून एक हजार पोलीस कर्मचारी तातडीने देण्यात यावेत, असा नवीन प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
सहावे परिमंडळ लवकरच पुणे पोलिसांमध्ये – पुणे शहरात सध्या पाच परिमंडळं (Zones) आहेत. परंतु शहराच्या विस्तारासोबत गुन्हेगारी नियंत्रणासाठी सहाव्या परिमंडळाची निर्मिती आवश्यक झाली आहे. यासाठी स्वतंत्र उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलीस अधिकारी नेमण्याची तयारी सुरू असून, गृह विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
पुणे शहरात वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, पोलीस प्रशासन सज्ज होत असून, नवीन सायबर ठाण्यांची निर्मिती आणि मनुष्यबळाची वाढ ही अत्यंत आवश्यक आणि स्वागतार्ह पावले ठरणार आहेत.