Home Breaking News IIT बॉम्बे कॅम्पस मध्ये अनधिकृत घुसखोरीचा प्रकार; सुरक्षा यंत्रणा सतर्क, १४ दिवसांपासून...

IIT बॉम्बे कॅम्पस मध्ये अनधिकृत घुसखोरीचा प्रकार; सुरक्षा यंत्रणा सतर्क, १४ दिवसांपासून तरुण राहत होता विद्यार्थ्यांच्या वेशात!

89
0

मुंबई – IIT बॉम्बे सारख्या प्रतिष्ठित आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्थेच्या परिसरात एक तरुण बेकायदेशीरपणे १४ दिवसांपर्यंत वास्तव्य करत होता, ही धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बिलाल अहमद फैयाज अहमद तली (वय २२) असे या आरोपीचे नाव असून तो कर्नाटकातील मंगलुरू येथील रहिवासी आहे.

ही घटना १७ जून रोजी उघडकीस आली, जेव्हा कॅम्पस सुरक्षा रक्षकांनी या तरुणावर संशय घेऊन चौकशी केली. त्यावेळी तो विद्यार्थ्यांच्या वेशात राहत असल्याचे समजले. पुढे त्याला तत्काळ पवई पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

गुप्तहेर कारवायांचा संशय

मुंबई पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या तरुणाने IIT परिसरात कोणत्या हेतूने प्रवेश केला? त्याच्याकडून कोणती गुप्त माहिती गोळा करण्यात आली होती का? याबाबत अधिक तपास सुरू आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 329(3) आणि 329(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षा यंत्रणा सतर्क

या घटनेनंतर IIT बॉम्बे प्रशासनाने त्वरित सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. कॅम्पस परिसरात आता बाह्य व्यक्तींच्या हालचालींवर अधिक कठोर नजर ठेवली जात आहे. विद्यार्थी व प्राध्यापक यांना संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ सुरक्षा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अशा प्रकारामुळे IIT सारख्या संस्थेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा, गोपनीय शैक्षणिक माहिती आणि संशोधन प्रकल्पांची गोपनीयता धोक्यात येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण केवळ IIT पर्यंत मर्यादित न राहता देशातील सर्व शैक्षणिक संस्थांसाठी इशारा ठरू शकते, असे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.