Home Breaking News पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा; चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी 550...

पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा; चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी 550 कोटींचा प्रस्ताव सादर

पुणे – पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे भेटीदरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव गडकरी यांच्याकडे सादर केला. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते.

हा प्रकल्प शिवाजी रोड आणि बाजीराव रोड या दोन प्रमुख रस्त्यांखाली २.५ किलोमीटर लांबीचे दोन भुयारी बोगदे उभारून साकारण्यात येणार आहे. हे बोगदे जमिनीपासून सुमारे ३० फूट खोल बांधण्यात येणार असून, या भुयारी मार्गामुळे वाहतुकीचा बोजा कमी होऊन ऐतिहासिक परिसराचे सौंदर्य व सुरक्षिततेची जपणूक केली जाणार आहे.

आमदार हेमंत रासने म्हणाले, “शिवाजी रोड व बाजीराव रोड हे पुण्याच्या उत्तर-दक्षिण वाहतुकीचे प्रमुख दुवे आहेत. या भागांमध्ये धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, ऐतिहासिक वारसा व प्रमुख बाजारपेठा असल्याने दररोज लाखो वाहनांची गर्दी होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळेच या भागात भुयारी मार्ग आवश्यक आहेत.”

गडकरींनी या प्रकल्पास सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम टप्प्यात असून, राज्याच्या अर्थ विभागाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे,” अशी माहिती गडकरी यांनी दिली.

हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या मर्यादेत येत असल्याने केंद्र सरकारकडूनही निधी मिळण्याची शक्यता आहे. अंदाजे ५५० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राज्य सरकार व केंद्र सरकारच्या संयुक्त निधीतून उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे केवळ वाहतूक सुलभ होणार नाही, तर पुण्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीचेही रक्षण होणार आहे. शिवाजी रोड व बाजीराव रोड हे ऐतिहासिक वारशाचे जिवंत प्रतीक असून, त्यांचे जतन व संवर्धन करत भविष्यातील वाहतूक आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.