Home Breaking News एक वर्ष जुनी बोलेरो पिकअप चोरी उघडकीस! वाघोली पोलिसांच्या सतर्क कारवाईत सराईत...

एक वर्ष जुनी बोलेरो पिकअप चोरी उघडकीस! वाघोली पोलिसांच्या सतर्क कारवाईत सराईत आरोपी जेरबंद

पुणे शहरातील वाघोली पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रतिबंधक पथकाने एक मोठी कामगिरी करत लोणावळा परिसरातून एक वर्षापूर्वी चोरीस गेलेल्या बोलेरो पिकअप टेम्पोचा छडा लावला आहे. या कारवाईत रामनगर, वारजे माळवाडी येथील रहिवासी सुनिल आण्णा कांबळे (वय ४०) या सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

घटना घडली कशी?
दि. १९ जून २०२५ रोजी, वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल, अंमलदार प्रदीप मोटे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, समीर भोरडे हे गुन्हे प्रतिबंधक अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना वाघेश्वर मंदिर परिसरात बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की वाघोली बाजारतळ परिसरात एक पांढऱ्या रंगाची संशयास्पद बोलेरो पिकअप उभी आहे, ज्यावर अर्धवट नंबर प्लेट आहे.

तात्काळ कारवाई:
पोलिसांनी त्वरित बाजारतळ येथे जाऊन संशयित पिकअप व त्यामध्ये असलेला इसम ताब्यात घेतला. त्याने आपले नाव सुनिल आण्णा कांबळे असे सांगितले. गाडीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्यामुळे त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेले.

तपासात उघड झाले धक्कादायक सत्य!
विश्वासात घेऊन चौकशी केली असता, सुनिल कांबळे याने गाडी ही एक वर्षापूर्वी लोणावळा तालुक्यातील औढोली, मावळ येथून चोरी केल्याचे कबूल केले.
लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधून गु.र.नं. १२/२०२४, कलम ३७९ (चोरी) अंतर्गत गुन्हा नोंद असल्याची खात्री झाली.

पुढील तपासासाठी आरोपी आणि गाडी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हवाली:
सदर आरोपी व चोरीस गेलेली बोलेरो पिकअप टेम्पो लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात तपासासाठी देण्यात आली आहे.

ही कारवाई वाघोली पोलिसांच्या गुन्हे प्रतिबंधक क्षमतेचा उत्तम नमुना आहे.
एक वर्ष जुनी चोरी उघडकीस आणून पोलीस दलाने नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ केला आहे.