दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या भक्तांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांच्या दक्षतेचे व गुन्हेगारीविरुद्ध असलेल्या निर्धाराचे प्रत्यक्ष उदाहरण ठरली आहे.
दि. २० जून २०२५ रोजी दिंडीच्या मार्गावर मोबाईल चोरीच्या घटना घडू लागल्याने, काही वारकऱ्यांनी तक्रारीसाठी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचा धाव घेतली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील यांनी तत्काळ तपास पथकाला सक्रिय केले.
पोलीस अंमलदार थोरात, कौस्तुभ जावध, राऊत व निगराणी पथकातील अंमलदार लोणकर यांनी बीट मार्शल पथकासह मार्केटयार्ड परिसरात गस्त वाढवून संशयितांची शोधमोहीम सुरु केली. याच दरम्यान, रेकॉर्डवरील आरोपी प्रकाश देवराम परिहार (वय २९, रा. लोहियानगर, पुणे) यास संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आणि त्याचा साथीदार मोहम्मद मनान जमाल शेख (वय २५, रा. मार्केटयार्ड, पुणे) यांनी मोबाईल चोरीची कबुली दिली.
त्यांच्याकडून तिघा भक्तांचे चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, अधिक चौकशीत त्यांनी आणखी दोन मोबाईल चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्याविरुद्ध गु.र.नं. १३६/२०२५ व १३७/२०२५ भा.दं.वि. कलम ३०३(२) अन्वये गुन्हे नोंदवून अटक करण्यात आली आहे.
🔹 मोबाईल चोरीप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत!
🔹 दिंडीतील भाविकांची सुरक्षा पोलिसांकडून निश्चित!
🔹 दक्ष पोलिसांच्या तत्पर कारवाईने टोळीचा पर्दाफाश
ही कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोज पाटील, उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त श्री. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील, गुन्हे निरीक्षक श्रीमती सुनिता नवले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस अंमलदार थोरात, जावध, राऊत, लोणकर व बीट मार्शल पथकातील इतर अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.





