पुणे – पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि PMRDA अंतर्गत ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या PMPML बस सेवेमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, विशेषत: खाजगी कंत्राटदारांकडून चालवल्या जाणाऱ्या बससेवांमुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
PMPML च्या अधिकृत आकडेवारीनुसार एप्रिल २०२२ ते १० जून २०२५ या ३९ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३८५ बस अपघात घडले असून, त्यातील २३७ अपघात खासगी कंत्राटी बसचालकांमुळे झाले आहेत. या अपघातांमध्ये ५१ नागरिकांचा मृत्यू, ७४ गंभीर जखमी तर ११२ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
PMPML च्या स्वत:च्या ताफ्यातील १४८ बस अपघातांमध्ये ३६ मृत्यू
तुलनेत PMPML च्या स्वतःच्या ६५० बसपैकी झालेल्या १४८ अपघातांमध्ये ३६ जणांचा मृत्यू, ३६ गंभीर जखमी आणि ७१ किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, ९५० कंत्राटी बसांद्वारे होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यू आणि गंभीर जखमींची संख्या अधिक आहे.
राहु-देवकरवाडी येथील अपघातानंतर पुन्हा चर्चेला उधाण
१० जून २०२५ रोजी दौंड तालुक्यातील राहु-देवकरवाडी परिसरात PMPML बसने पादचारीला उडवल्याने मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने PMPML आणि खासगी चालकांवर असलेली जबाबदारी व शिस्तीचा अभाव पुन्हा समोर आला आहे.
अपघातांची वार्षिक आकडेवारी
२०२२-२३: १७३ अपघात (सर्वाधिक)
२०२३-२४: १३१ अपघात
२०२४-२५: ७२ अपघात
मार्च २०२५ ते १० जून: ९ अपघात
नागरिकांची भावना – “बसमध्ये बसणे म्हणजे जिवावरचा प्रश्न!”
मारुती कदम (दररोज कामासाठी कात्रज ते शिवाजीनगर बसने प्रवास करणारे) म्हणतात, “खाजगी चालक बस भरधाव घेतात, अचानक ब्रेक लावतात, गर्दीच्या ठिकाणी वळण घेताना धाडसी वर्तन करतात. मी स्वत: दोन अपघात डोळ्यांनी पाहिले आहेत. काही बसेस तर जणू रस्त्यावर जीवाशी खेळत असल्यासारख्या वाटतात.”
PMPML कडून प्रशिक्षण व कारवाईचे आश्वासन
मुख्य व्यवस्थापक सतीश गवहाणे यांनी सांगितले, “सर्व PMPML चालकांना १० दिवसांचे आधुनिक प्रशिक्षण दिले जाते. अपघातात सातत्याने दोषी आढळणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण तीन वर्षांत घटले आहे.”
कंत्राटी PMPML बस सेवेची ‘सुरक्षा’ डगमगतेय! अपघातांचे वाढते प्रमाण चिंतेची घंटा
➡️ ३८५ पैकी २३७ अपघात खासगी बसद्वारे ➡️ ३९ महिन्यांत ८७ मृत्यू, ११० गंभीर जखमी ➡️ पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण, प्रवास म्हणजे जुगार ➡️ PMPML ची शिस्त व नियंत्रण यंत्रणा अडचणीत ➡️ अपघात टाळण्यासाठी आणखी कठोर उपायांची गरज