पुणे – वारीची परंपरा, श्रद्धा आणि भक्तीच्या महामार्गावर निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांनी एक विशेष वेबसाईट लॉन्च केली आहे. या वेबसाईटद्वारे नागरिकांना रिअल टाइममध्ये पालखीचा सध्याचा मार्ग, वाहतूक परिस्थिती, रस्ते बंदी आणि डायव्हर्जन्सची माहिती सहज मिळणार आहे.
पालखी सोहळा आणि वाहतूक नियंत्रण – एकत्रित प्रयत्न पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “वारी दरम्यान वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि पुणेकर नागरिकांच्या वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही ही वेबसाइट पुनर्रचित केली आहे. पालखीचा वर्तमान स्थान, प्रमुख/शेवटचा टप्पा, पुढील मुक्कामी पोहोचण्याचा अंदाजित वेळ, मार्गावरील पार्किंग व्यवस्था, बंद रस्ते, डायव्हर्जन्स आणि थेट मैदानातून मिळणाऱ्या प्रतिमा या सर्व गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.”
वारीचा उत्साह पावसातही ओसंडून वाहतोय! अलिकडच्या सततच्या पावसाला न जुमानता, हजारो वारकरी ‘जय हरी विठ्ठल’ आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषात देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे निघाले आहेत. भक्तिरसात न्हालेल्या या पालख्या सध्या पुणे शहराच्या दिशेने प्रस्थान करत आहेत.
२१ जून रोजी पुणे शहरात पालखी मुक्काम करणार या दोन पालख्या उद्या (२१ जून) पुणे शहरात मुक्कामी थांबणार असून, त्यानंतर त्या आपापल्या वेगवेगळ्या मार्गांनी पंढरपूरकडे प्रस्थान करतील. यंदाची आषाढी एकादशी ६ जुलै रोजी असून, त्यादिवशी पालख्या पंढरपूरमध्ये पोहोचतील. या २० दिवसांच्या यात्रेत सुमारे २५० किमीचा प्रवास केला जातो, ज्यामध्ये अनेक गावांत मुक्काम असतो.
पुणे पोलिसांकडून नागरिकांना आवाहन पुणे पोलिसांनी पुणेकरांना आवाहन केले आहे की, वारीच्या दरम्यान वाहतुकीचे नियम पाळावेत, आणि ट्रॅफिक वेबसाइटवर नियमित अपडेट पाहूनच प्रवास नियोजन करावे. वारीसाठी पुणे पोलिसांची स्मार्ट पावले! लाईव्ह ट्रॅकिंग वेबसाइटसह वाहतुकीची अपडेट्स एका क्लिकवर
➡️ पालखीचा थेट मार्ग, थांबे, वेळा, प्रतिमा उपलब्ध ➡️ वाहतूक अडथळे, बंद रस्ते व डायव्हर्जन्सची माहिती ➡️ २१ जून रोजी पुणे मुक्काम; ६ जुलै रोजी पंढरपूर आगमन ➡️ पावसातही वारकऱ्यांचा उत्साह टिकून ➡️ नागरिकांनी पोलिसांच्या संकेतस्थळावरून अपडेट घ्यावेत – आवाहन