पुणे (दि. १९ जून २०२५) – पुणे शहराच्या मार्केटयार्ड वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या गंगाधाम परिसरातील वाढती वाहतूक समस्या, अपघाताचे वाढते प्रमाण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता पुणे वाहतूक पोलीस आणि महापालिकेने संयुक्तपणे महत्वाचे निर्णय घेतले आहेत. विशेषतः कान्हा हॉटेल ते गंगाधाम चौक आणि टिळेकर चौक दरम्यान जड वाहनांच्या प्रवेशावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
वाहतुकीवर निर्बंध – अवजड वाहनांवर बंदी:
२४ तास संपूर्ण बंदी: ट्रक, मिक्सर, डंपर, कंटेनर व इतर सर्व जड वाहनांना कान्हा हॉटेल – गंगाधाम चौक व टिळेकर चौक – गंगाधाम चौक दरम्यान संपूर्ण दिवस प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे.
सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत बंदी: लुल्लानगर चौक – गंगाधाम चौक – चंद्रलोक हॉस्पिटल चौक गंगाधाम चौक – वखार महामंडळ चौक – सेव्हन लव्हज चौक या मार्गांवर सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत जड वाहनांना प्रवेश बंद.
अपघात रोखण्यासाठी रस्ते सुरक्षेचे विशेष उपाय:
या रस्त्यावर तीव्र उतार असल्याने जड वाहनांमुळे अपघात घडत आहेत.
गंगाधाम बस स्टॉप, पासलकर चौक, भवानी माता मंदिर, आई माता मंदिर, वाय जंक्शन आदी ठिकाणी आयआरसी मानकानुसार हाईट बॅरिअर बसवण्याचे आदेश.
आई माता मंदिराजवळील जीर्ण झालेला रंम्बलर काढून नवीन आणि दर्जेदार गतीरोधक बसविण्याची सूचना महापालिकेच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आली आहे.
कायदेशीर कारवाईची ठोस आकडेवारी:
३६ गुन्हे जड वाहनांवर भा.न्या.सं.क. २८१ व २२३ अन्वये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल.
३२,२५६ वाहनांवर कारवाई करत ₹४५.६२ लाखांचा दंड वसूल.
१६ जून २०२५ पासून १४ नव्याने गुन्हे दाखल.
दारूबंदी आणि अन्नधोरण नियंत्रण उपाय:
दारूबंदी कायद्यानुसार (१४२ (२)) ३ परमिट रूम चालकांना नोटीस
२ परमीट रूम परवाने रद्द करून स्थलांतरासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कळवले.
अन्न व औषध प्रशासनाकडून मार्केटयार्डातील आस्थापनांची पाहणी करून कारवाईसाठी सूचना.
इतर महत्त्वपूर्ण उपाययोजना:
फुटपाथवरील भाजी विक्रेत्यांवर १३ खटले दाखल (मपोकाक १०२ अन्वये).
३ कारवाया मपोकाक १२२ (क) नुसार.
अवैध फ्लेक्स हटवण्यासंदर्भात पत्रव्यवहार.
पोलीस पेट्रोलिंग व जनजागृती मोहिमाही सक्रियपणे राबवली जात आहे.
प्रशासनाचे आवाहन:
गंगाधाम, टिळेकर चौक आणि मार्केटयार्ड परिसरात राहणाऱ्या व प्रवास करणाऱ्या नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा, नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास घडवून आणावा.