धाराशिव (१७ जून): महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेल्या श्रीतुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी १,८६५ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी तुळजापूर विकास प्रकल्प हाती घेण्यात आला असून, याचे भूमिपूजन येत्या नवरात्रौत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. ही माहिती परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिली.
या बैठकीस आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना आदी अधिकारी उपस्थित होते.
सरनाईक म्हणाले की, “तुळजाभवानी देवी हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण शक्तिपीठ असून, या ठिकाणी दरवर्षी १ ते १.५ कोटी भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे.”
या प्रकल्पामध्ये मंदिर परिसराचा तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत रस्ते सुधारणा, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, भक्त निवास, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, आणि इतर अत्याधुनिक सुविधा समाविष्ट असतील.
मंत्री सरनाईक यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रिया यांचा समांतर वेगाने पाठपुरावा करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.
अष्टभुजा प्रतिमेवरून भक्तगणांचा विरोध – समंजस भूमिका घेण्याचे निर्देश
विकास आराखड्यानुसार १०८ फूट उंच शिल्प उभारले जाणार असून त्यात श्री तुळजाभवानी माता शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना दाखवण्यात आली आहे. मात्र या शिल्पात देवीची प्रतिमा अष्टभुजाकृती दाखवल्यामुळे अनेक भाविक व पुजारी मंडळांनी आक्षेप घेतला.
या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी भावनांचा आदर ठेवत संकेतस्थळावरून ती प्रतिमा हटवण्याचे आदेश दिले. तसेच मूर्तीची अंतिम रूपरेषा ठरवताना पुरातत्त्व विभाग, इतिहासकार आणि धार्मिक तज्ज्ञांशी सल्लामसलत करावी, असेही स्पष्ट निर्देश दिले.
यापुढे विकास प्रकल्पासंबंधित कोणतेही परिपत्रक किंवा प्रसिद्धीपत्रक अध्यक्षाच्या (सरनाईक) मंजुरीशिवाय जाहीर करण्यात येऊ नये, अशी सक्त ताकीदही त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
तुळजापूर विकास प्रकल्प – भविष्यातील धार्मिक पर्यटन केंद्र
हा प्रकल्प केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वाढत्या भाविकसंख्येच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर हे आधुनिक सुविधांनी परिपूर्ण धार्मिक पर्यटनस्थळ बनणार असून स्थानिकांना रोजगाराच्या संधीही प्राप्त होणार आहेत.
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार कटिबद्ध असून येत्या ३ ते ३.५ वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.