Home Breaking News खुनाचा गुन्हा उघडकीस: पुणे पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई, उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार अटकेत!

खुनाचा गुन्हा उघडकीस: पुणे पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई, उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार अटकेत!

169
0

पुणे | प्रतिनिधी :- शहरातील आंबेगाव बु. परिसरात घडलेल्या एका अमानुष आणि निर्घृण खुनाचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी आपल्या कुशल तपास कौशल्याची पुन्हा एकदा छाप उमठवली आहे. दिनांक २० मे २०२५ रोजी सहस रोडवर एका अज्ञात महिलेवर धारधार हत्याराने केलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला होता. या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी तब्बल ३२०० किलोमीटरचा प्रवास करत उत्तर प्रदेशमधून आरोपीला अटक केली आहे.

ही महिला नवले पुलावर शेवटचे पाहण्यात आली होती. त्या आधारावर तपास सुरु करण्यात आला. मृत महिलेच्या मोबाईलवरून तिच्या हालचालीचा मागोवा घेत पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मुसळधार पावसामुळे तपासात अडथळे येत असतानाही पोलिसांनी खाजगी आस्थापनांचे व्हिडीओ मिळवले. त्यात एक रिक्षा दिसली. तपास अधिक खोलात जाताच टीव्हीएस कंपनीच्या काळ्या हुड असलेल्या रिक्षांची यादी घेऊन ती पडताळणी करण्यात आली.

शेवटी, नवले पुलाजवळील एका कॅमेऱ्यात मृत महिला एका विशिष्ट रिक्षात बसताना दिसली. या रिक्षाच्या आधारे आरोपी शाहरुख शकील मन्सुर (वय २७) याच्यावर संशय गेला. तो मूळचा उत्तर प्रदेशमधील अमखेरा, शहाजपूर येथील असून सध्या हडपसरमध्ये राहत होता. विशेष म्हणजे तो आधीही जबरी चोरी व चोरीचे ५ गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला सराईत गुन्हेगार आहे.

पोलिसांनी त्वरित कारवाई करत अमखेरा, शहाजपूर, धामपूर, बिजनोर (उत्तर प्रदेश) येथे पाठवलेले पथक पाठवले. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने कठोर परिश्रम करत आरोपीला ९ जून २०२५ रोजी धामपूर पोलीस स्टेशन येथे अटक केली.

या कौशल्यपूर्ण कारवाईसाठी मा. अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील आणि सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तपासात पोलीस निरीक्षक साळगावकर, गुन्हे निरीक्षक राहुल खिलारे, PSI मोकाशी, व पोलीस अंमलदार शेडगे, पिसाळ, महांगरे, बारवकर, पवार, सरपाले, जमदाडे, चौधरी, सुतार, आगळे, बोरगे, चोरमोले, साबळे, खैरमोडे यांचा सक्रिय सहभाग होता.

ही कामगिरी म्हणजे पुणे पोलिसांच्या चिकाटी, समर्पण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल.