Home Breaking News जलसंवर्धनातून विकसित महाराष्ट्र घडवूया – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

जलसंवर्धनातून विकसित महाराष्ट्र घडवूया – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

नागपूर – “जलसंवर्धन हा काळाची गरज आहे. भविष्यातील पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी सांडपाण्याचा पुनर्वापर करून ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे,” असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पात नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा केला जात असल्याचे उदाहरण देत त्यांनी जलपुरवठ्याच्या पर्यायी स्रोतांच्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले. वनामती सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जनकल्याणकारी समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेत दुसऱ्या दिवशी (दि. ८ जून) आयोजित ‘यशोगाथांचे सादरीकरण’ या सत्रात ते बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंवर्धनाच्या दिशेने राज्यात महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी पाण्याचे योग्य नियोजन आणि शाश्वत व्यवस्थापन अनिवार्य आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.”
या परिषदेत तज्ज्ञांनी पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनाच्या विविध यशोगाथा सादर करत गावपातळीवरून राज्यपातळीपर्यंत प्रेरणादायी कार्याची माहिती दिली. मुरादपूर येथील रुपेश सयाम यांनी ‘तरंगते सौर ऊर्जा आधारित उपसा सिंचन योजना’ची माहिती दिली. पूर्ती जलसिंचन संस्थेचे मिलिंद भगत यांनी ‘तामसवाडा पॅटर्न’चे सादरीकरण केले. वाशिम जिल्ह्यातील सचिन कुलकर्णी यांनी पांगरी महादेव गावामधील ग्रामवासीयांच्या श्रमदानातून घडवलेल्या जलक्रांतीचे उदाहरण मांडले.
कोल्हापूर येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी क्षारपड जमिनीच्या सुधारणा प्रकल्पाची माहिती दिली. सांगली नदी पुनर्जीवन प्रकल्पाचे मार्गदर्शक विलास चौथाई यांनी जलप्रवाह पुनर्संचयनाचे यशस्वी मॉडेल उभे केल्याबद्दल माहिती सादर केली.
बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, “विदर्भातील ९ हजारांहून अधिक मृतावस्थेतील बंधारे दुरुस्त करून मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण करता येऊ शकतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी या दृष्टीने पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे.”
महसूल विभागामार्फत नागपूर जिल्ह्यात ‘नालेजोड अभियान’ राबविण्यात येत आहे. पर्यावरण दिनानिमित्त ५ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘आईच्या नावाने एक झाड’ हा संकल्प राबवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे आणि अनेक नामवंत जलतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.