पुणे : भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घराच्या सुरक्षिततेला धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार धमक्या, शिवीगाळ आणि घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शंकर सर्जेराव धुमाळ (वय ४७) या व्यक्तीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धनकवडी परिसरात घडलेली ही घटना केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेच नव्हे तर लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेवरही मोठा प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे.
धुमाळने तीन वेळा आमदार तापकीर यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे, त्याने सुरक्षा रक्षक अजित गणपत देवघरे यांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिली होती. सुरुवातीला किरकोळ कारवाई करून सोडण्यात आलेला आरोपी, पुन्हा पुन्हा येऊन गोंधळ घालत राहिला. यामुळे आमदारांच्या कुटुंबीयांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
या पार्श्वभूमीवर आमदार तापकीर यांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून तातडीची कारवाई करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी बुधवारी (दि. २८ मे) कठोर पावले उचलून आरोपी शंकर धुमाळला अटक केली.
आरोपीवर खालील कलमान्वये गुन्हे दाखल :
-
मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 85(1)
-
भारतीय दंड संहिता : कलम 352, 351(2)(3), 132, 333
-
पोलिस अधिनियम 1922 : कलम 3
पोलीस तपास:
पोलिसांकडून आरोपीच्या पूर्वीच्या वर्तनाची माहिती घेतली जात असून, तो मानसिकदृष्ट्या असंतुलित आहे का? याचाही तपास केला जात आहे. तसेच त्याने हे कृत्य वैयक्तिक कारणामुळे केले की कोणाच्या सांगण्यावरून, हे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
घटनास्थळावरुन काही ठळक मुद्दे :
-
वारंवार आमदारांच्या घराजवळ येऊन गोंधळ
-
सुरक्षारक्षकाला धमकी आणि शिवीगाळ
-
सुरुवातीला किरकोळ कारवाई, नंतर आयुक्तांकडे पत्र
-
बुधवारी पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांत केली अटक
-
राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह





