पुणे | मुळशी :- वैष्णवी हगवणे या तरुणीच्या दुर्दैवी व संशयास्पद मृत्यूप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्या दुःखात सहभागी होत मनापासून सांत्वन केलं.
या भेटीत बोलताना तटकरे म्हणाल्या, “ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. एका संवेदनशील मुलीचं आयुष्य अन्यायाच्या सावटाखाली संपलं, यापेक्षा दुःखद काही असूच शकत नाही. या कठीण काळात मी आणि महाराष्ट्र शासन संपूर्ण ताकदीने कासपटे कुटुंबासोबत उभे आहोत.”
अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळणार – कोणताही समझोता नाही
तटकरे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, या प्रकरणात दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. न्यायाच्या प्रक्रियेत कोणताही तडजोड केला जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. “वैष्णवीस न्याय मिळवून देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ती शासन पूर्ण ताकदीने पार पाडेल,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
वैष्णवीच्या चिमुकल्या बाळासाठी तातडीने वैद्यकीय तपासणीचे निर्देश
वैष्णवी हगवणे यांच्या अर्भकाच्या सुरक्षिततेबाबतही तटकरे यांनी काळजी व्यक्त केली. “त्या चिमुकल्या जीवासाठी तत्काळ दर्जेदार डॉक्टरांकडून संपूर्ण आरोग्य तपासणी होणं अत्यावश्यक आहे. यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचंही लक्ष
या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही बारीक लक्ष असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. “या संपूर्ण प्रकरणावर सरकार गंभीर असून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च पातळीवरून पावलं उचलली जातील,” असं त्या म्हणाल्या.
महिला व बालकल्याण विभागही सक्रीय
या शोकमग्न बैठकीस महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, वैशाली नगवडे, तसेच नाना काटे आणि रुपाली थोरंबे यांचीही उपस्थिती होती. सर्वांनी मिळून या प्रकरणाच्या गंभीरतेवर चर्चा केली आणि पुढील कारवाईबाबत योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं.