पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळे सौदागर भागात नागरिकांच्या सेवेसाठी सुरू असलेला महापालिकेचा दवाखाना आणि व्यायामासाठी असलेली तालिम सध्या जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या दोन्ही सुविधा नव्याने, अत्याधुनिक स्वरूपात उभारण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. त्यांनी यासाठी थेट महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना सविस्तर निवेदन दिले.
दवाखाना अपुरा आणि जीर्ण
नाना काटे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग क्र. २८ रहाटणी-सौदागर परिसरातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवणारा हा दवाखाना आजच्या गरजांना पूरक राहिलेला नाही. येथे येणाऱ्या रुग्णांना बसण्यासाठी जागा अपुरी आहे. तात्पुरत्या स्वरूपात पत्रा शेड उभारण्यात आली आहे, जी उन्हा-पावसात फारशी उपयोगी ठरत नाही. लसीकरणासारख्या महत्त्वाच्या सेवा देखील अपुऱ्या जागेमुळे अडथळ्यांत सापडत आहेत.
तालिमसुद्धा जीर्ण; खेळाडूंना अडचण
पिंपळे सौदागर परिसरात कुस्ती, कबड्डी, वेटलिफ्टिंग व इतर क्रीडा प्रकारांचे अनेक खेळाडू आहेत. मात्र त्यांच्यासाठी असलेली महापालिकेची तालिम जिम (व्यायामशाळा) देखील वारंवार डागडुजी करूनही जीर्ण अवस्थेत आहे. या ठिकाणी अत्याधुनिक क्रीडा साहित्य, व्यायाम उपकरणे, शुद्ध हवा व योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत.
स्ट्रक्चरल ऑडिट करून नव्याने उभारणीची मागणी
नाना काटे यांनी आयुक्तांना सूचित केले आहे की, या दोन्ही इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करावे. व त्या ठिकाणी सुसज्ज व अद्ययावत आरोग्य केंद्र व तालिम केंद्र उभारण्यात यावे. यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार आरोग्य व क्रीडा सुविधा लाभतील.
नाना काटे यांचे मत
“महापालिकेचे उद्दिष्ट नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा पुरवणे हेच असावे. पिंपळे सौदागर हे वेगाने विकसित होणारे उपनगर आहे. त्यामुळे इथल्या दवाखाना व तालिम या दोन्ही सेवा भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन उभारल्या गेल्या पाहिजेत,” असे मत नाना काटे यांनी व्यक्त केले.
स्थानिक नागरिकांची मागणी
स्थानिक रहिवासी संघटनांनी देखील नाना काटे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक नागरिकांनी सोशल मिडियावरून ही मागणी लवकरात लवकर मान्य करण्याची विनंती महापालिकेकडे केली आहे.