पुणे | पुण्यातील गाजलेल्या आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) मोठं यश मिळालं आहे. २०२३ पासून फरार असलेल्या आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दोन संशयितांना इंडोनेशियातून परत येताना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबईच्या टर्मिनल-२ आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली.
अटक केलेले संशयित कोण?
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं अब्दुल्ला फैज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान अशी आहेत. हे दोघंही पुण्यातील कोंढवा भागातील रहिवासी असून, गेल्या दोन वर्षांपासून इंडोनेशियामध्ये लपून बसले होते.
बॉम्ब बनवण्याचं कट कारस्थान
NIA च्या माहितीनुसार, या दोघांनी २०२२ ते २०२३ दरम्यान कोंढवा येथे भाड्याने घेतलेल्या घरात आयईडी (बॉम्ब) बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यांनी स्वतः तयार केलेल्या स्फोटकांचं चाचणी स्फोट (controlled explosion) जंगलात नेऊन केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या ताब्यातून स्फोटके, तंबू, ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांची सतर्कता आणि गुन्हेगारांचा पर्दाफाश
या प्रकरणातील मोठा ब्रेकथ्रू १८ जुलै २०२३ रोजी रात्री २.३० वाजता कोथरूड पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या गस्तीदरम्यान घडला. वाहन चोरीच्या संशयावरून तिघांना ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी मोहम्मद शहनवाज आलम उर्फ शफी उर्फ अब्दुल्ला (झारखंड), मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनूस साकी (म. प्र.) हे अतिरेकी कोथरूड परिसरात ग्राफिक डिझायनर म्हणून राहात असल्याचं समोर आलं.
एनआयएने उघड केला अतिरेकी कट
NIA ने स्पष्ट केलं आहे की, या संपूर्ण गटाचा उद्देश आयएसआयएसच्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित देशात दहशत माजवून इस्लामिक राजवट प्रस्थापित करणं होता. सामाजिक सौहार्द बिघडवून देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करणं हा या टोळीचा मुख्य हेतू होता.
इनामही घोषित केले होते
या दोघांवर सप्टेंबर २०२३ मध्ये ३ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. अखेर जवळपास दोन वर्षांनी NIA ला त्यांना अटक करण्यात यश आलं.
अन्य अटक झालेले आरोपी
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नासिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बरोडवाला, शमिल नाचन, अकीफ नाचन, शहनवाज आलम आणि साकीब नाचन (प्रमुख सूत्रधार) यांचा समावेश आहे.
कायदेशीर प्रक्रिया सुरु
अटक करण्यात आलेल्या अब्दुल्ला शेख आणि तल्हा खान यांना शनिवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील चौकशीसाठी NIA त्यांची कोठडी मागणार आहे.