पुणे :- टर्कीने पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिल्यानंतर भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील आडत व्यापाऱ्यांनी टर्कीहून सफरचंद व सुकामेवा आयात बंद करण्याचा निर्णय घेतला असून, याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “देशप्रथम” असे म्हणत जोरदार पाठिंबा दिला आहे.
“देशप्रथम हेच आपलं ब्रीद” – फडणवीसांची प्रतिक्रिया
फडणवीस म्हणाले, “पाहलगाममध्ये जे निर्दोषांचे बळी घेतले गेले, त्यामागे जे आहेत तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांनाही धडा शिकवण्याची गरज आहे. पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. ही खरी राष्ट्रभक्ती आहे.”
पाकिस्तानकडून धमकी? – व्यापाऱ्याचा खळबळजनक दावा
पुण्यातील मार्केट यार्डमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) व्यापारी सुयोग झेंडे यांनी पत्रकारांना सांगितले की, टर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार जाहीर केल्यानंतर त्यांना पाकिस्तानमधून एक धमकीवजा व्हॉईस मेसेज प्राप्त झाला आहे.
“सकाळी ९ वाजता अनेक फोन आले, पण मी उचलले नाहीत. त्यानंतर एक व्हॉईस नोट आली. त्या संदेशात भारताविरोधात अपशब्द होते, आणि म्हटले गेले की भारत किंवा भारतातील व्यापारी पाकिस्तान व टर्कीला काही करू शकत नाहीत. मीही त्याला उत्तर दिलं,” असे झेंडे यांनी स्पष्ट केलं.
मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांचा निषेध
टर्कीच्या भूमिकेला विरोध करताना पुणे मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांनी टर्कीहून आयात केलेली सफरचंदं रस्त्यावर फेकून तीव्र निषेध नोंदवला. हा दृश्य क्षण अनेकांनी मोबाइलमध्ये टिपून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यावर अनेक नागरिकांनी व्यापाऱ्यांचे कौतुक केले.
१,२०० कोटींचा आयात व्यवसाय थांबणार?
टर्कीमधून पुण्यात सफरचंद, लिची, प्लम, चेरी आणि सुकामेवा यांसारख्या वस्तू आयात केल्या जातात. यातील सफरचंदाचा आयात व्यवसायच सुमारे ₹१,२०० कोटींचा असल्याची माहिती झेंडे यांनी दिली.
व्यापाऱ्यांचा पोलिसांकडे धाव
पाकिस्तानकडून मिळालेल्या धमकीनंतर संबंधित व्यापारी लवकरच पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार असून, सुरक्षा वाढवण्याची मागणी करणार आहेत.
व्यापाऱ्यांच्या निर्णयाला राष्ट्रीय स्तरावरून प्रतिसाद
टर्कीवर बहिष्कार घालण्याच्या पुण्यातील या निर्णयाला देशभरातून समर्थन मिळत आहे. अनेक व्यापारी संघटनांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत टर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा विचार मांडला आहे.