Home Breaking News “एक दिवा – पराक्रमासाठी”: सीमारेषेवरील वीरांसाठी पुण्यात दिवे लावून अभिवादन!

“एक दिवा – पराक्रमासाठी”: सीमारेषेवरील वीरांसाठी पुण्यात दिवे लावून अभिवादन!

पुणे :- देशाच्या संरक्षणासाठी सीमारेषेवर दिवस-रात्र झगडणाऱ्या भारतीय सैन्यदलाच्या जवानांना आणि सीमावर्ती भागातील सामान्य नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिर प्रांगणात “एक दिवा – पराक्रमासाठी” हा प्रेरणादायी कार्यक्रम असीम फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, लहान मुलं, महिलावर्ग आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत एकात्मतेचा, शौर्याचा आणि आशेचा दिवा प्रज्वलित करून जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

सीमेवरची भीषण परिस्थिती – जीवितहानी व विध्वंस
नुकत्याच घडलेल्या संघर्षामध्ये पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या गोळीबारामुळे १५ निरपराध नागरिकांचा आणि ५ शूर सैनिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नौशेरा मधील लाम आणि पूंछ मधील मागनार मध्ये प्रचंड नुकसान झाले आहे, येथील गावांमध्ये घरांची पडझड, शेतीचे नुकसान, नागरिकांचे स्थलांतर आणि मानसिक अस्वस्थता यामुळे मोठा तणाव आहे.

असीम फाउंडेशनचे सातत्यपूर्ण कार्य
या संकटात पुणे शहरातील ‘असीम फाउंडेशन’ गेली अनेक वर्षे सीमावर्ती भागातील नागरिकांशी नातं जपून मदतीसाठी कार्यरत आहे. केवळ वस्तू किंवा आर्थिक मदतीपुरतेच नव्हे तर भावनिक आधार आणि एकतेचा संदेश पोहोचवण्यासाठीही हे काम महत्त्वाचे आहे.

“एक दिवा – पराक्रमासाठी” कार्यक्रमाचा भावनिक ठसा
कार्यक्रमात दिव्यांच्या उजेडात अनेकांनी वीर जवानांच्या त्यागाची आठवण काढत निःशब्द श्रद्धांजली वाहिली. एक दिवा हा केवळ प्रकाशाचा नव्हे, तर सामाजिक सलोखा, देशभक्ती आणि माणुसकीचा प्रतीक ठरला. “ते एकटे नाहीत; आम्ही त्यांच्यासोबत आहोत” हा संदेश या कार्यक्रमातून स्पष्टपणे पोहोचवण्यात आला.

कार्यक्रमातील ठळक बाबी:

  • चतु:श्रृंगी मंदिरात दिव्यांची साखळी

  • विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर भाषण

  • सीमावर्ती भागातील वास्तवावर माहितीपटाचे सादरीकरण

  • उपस्थितांमार्फत “सैनिकांसाठी एक पत्र” उपक्रम

  • सीमावर्ती शाळांतील मुलांना शैक्षणिक साहित्य पाठवण्याची घोषणा

 आयोजकांचे वक्तव्य:

“या दिव्यांचा प्रकाश सीमारेषेवरील अंधार पसरवेल, आणि त्या भागातील नागरिकांना आपण त्यांच्या पाठीशी आहोत याची जाणीव होईल,” असे असीम फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले.