Home Breaking News “नेत्रदान हे श्रेष्ठ दान” – अशोक जोशी यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासाठी...

“नेत्रदान हे श्रेष्ठ दान” – अशोक जोशी यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासाठी दिला प्रेरणादायी संदेश!

खोपोली | ७ मे २०२५ :- “मरावे परी नेत्र रुपी उरावे” या विचाराला वास्तवात उतरवत खोपोलीतील अशोक जगन्नाथ जोशी (वय ८५) यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. समाजसेवेची जाणिव आणि सामाजिक बांधिलकी जपणारे अशोक जोशी यांचे ६ मे रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.

नेत्रदानाची इच्छा – कुटुंबीयांचा उदात्त निर्णय

स्वतःच्या मृत्यूनंतर देखील कुणाच्या तरी जीवनात प्रकाश फुलवण्याची इच्छा अशोक जोशी यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात व्यक्त केली होती. ही इच्छा त्यांनी आपल्या चिरंजीव अमित जोशी, कन्या अर्चना पिटकर, तसेच जावई विवेक पिटकर यांच्याकडे बोलून दाखवली होती. नेत्रदानासारख्या पवित्र कार्यासाठी संपूर्ण कुटुंब एकवटले आणि त्यांनी ही अंतिम इच्छा पूर्णत्वास नेली.

नेत्रदान प्रक्रियेतील तत्पर सहभाग

जोशी कुटुंबाने ही माहिती डॉ. रणजीत मोहिते यांना दिल्यानंतर, त्यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अल्पेश शहा यांच्याकडे नेत्रदान प्रक्रियेची जबाबदारी सोपवली.

सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर, पनवेल येथील लक्ष्मी आय हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ डॉ. रणजीत मोहिते हे खोपोली येथील श्री पार्वती हॉस्पिटल येथे दाखल झाले आणि त्यांनी संपूर्ण सुसज्ज पद्धतीने नेत्रदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.

 कुटुंबाची भावना – “हे आमचं सौभाग्य!”

जोशी कुटुंबियांनी सांगितले की, “वडिलांची शेवटची इच्छा आपण पूर्ण करू शकलो याचं आम्हाला अतोनात समाधान वाटतं. समाजासाठी काही तरी उपयोगी काम त्यांच्या माध्यमातून घडलं, हे आमच्यासाठी मोठं भाग्य आहे.”

समाजासाठी संदेश – एक पाऊल अंधश्रद्धा विरुद्ध, जीवनाच्या उजेडासाठी

अशोक जोशी यांचं हे कार्य हे केवळ नेत्रदान नव्हे, तर समाजप्रबोधनासाठी प्रकाशवाट ठरणारी कृती आहे. त्यांच्या या कार्यातून असंख्य नागरिकांना प्रेरणा मिळेल आणि अधिकाधिक लोक नेत्रदानासाठी पुढे येतील, असा विश्वास सामाजिक संस्थांनी व्यक्त केला आहे.

श्रद्धांजली आणि कृतज्ञता

अशोक जोशी यांच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे दोन दृष्टिहीन व्यक्तींना दृष्टीचा उजेड मिळणार आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. त्यांच्या पुण्यस्मृतीला खोपोली शहर आणि सामाजिक संस्थांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.