पुणे | २६ एप्रिल २०२५ :- येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या अत्यंत कसोशीच्या आणि नियोजनबद्ध कारवाईतून कल्याणीनगर येथील जॉकी कंपनीच्या कपड्यांच्या दुकानातून सुमारे आठ लाख रुपये किंमतीचे कपडे चोरणारा आरोपी गणपत डांगी याला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. या कारवाईने परिसरात पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे.
बातमीदाऱ्याच्या माहितीतून सापडला धागा
दि. १९ एप्रिल २०२५ रोजी तपास पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे आणि पोलीस अंमलदार सागर जगदाळे यांना त्यांचे बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, गणपत डांगी नामक आरोपी कल्याणीनगर परिसरात थांबलेला आहे. माहिती मिळताच येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी यांना कळवण्यात आले आणि तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
घटनास्थळी तातडीची कारवाई
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोलिस निरीक्षक सुनील सोळुंके, उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे व त्यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत संशयित आरोपीला पळून जाण्याच्या प्रयत्नातच पकडले. चौकशीत आरोपीने स्वतःची ओळख गणपत मांगीलाल डांगी (वय ४४ वर्षे, रा. विठ्ठल नगर, सिंहगड रोड, पुणे) अशी दिली.
चोरीचे गूढ उलगडले
येरवडा पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा रजिस्टर क्र. २८०/२०२५ अंतर्गत BNS कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीने जून २०२४ पासून वेळोवेळी कल्याणीनगरमधील ‘एस.एल. एंटरप्रायझेस’ या जॉकी ब्रँडच्या दुकानातून लेडीज आणि जेन्ट्स अंडरगारमेंट्स चोरी केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान त्याच्याकडून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल – म्हणजेच टी-शर्ट्स, नाईट पँट्स आणि अंडरगारमेंट्स हस्तगत करण्यात आले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौतुक आणि मार्गदर्शन
ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परि.४) श्री. हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात सपोलिस निरीक्षक सुनील सोळुंके, श्रेणी पोउपनि प्रदीप सुर्वे, आणि स्टाफमधील दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, अमोल गायकवाड, प्रशांत कांबळे, नटराज सुतार, विजय अडकमोल, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, संदीप जायभाय, सुधीर सांगडे यांनी अथक प्रयत्न करून गुन्हा उघडकीस आणला.
ठळक मुद्दे :
-
कल्याणीनगर येथील जॉकी शॉपमधून सुमारे ८ लाखांचे कपडे चोरी.
-
आरोपी गणपत डांगी याचा गुन्ह्यात सहभाग सिद्ध.
-
पोलिसांनी ७.३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
-
जून २०२४ पासून सुरू असलेल्या चोरीच्या सत्राला अखेर पूर्णविराम.
-
येरवडा पोलिसांचे कसब आणि कार्यक्षमता पुन्हा सिद्ध.





