Home Breaking News पुणे लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई! ६ लाखांहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांचा नाश;...

पुणे लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई! ६ लाखांहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांचा नाश; १५ केसेसमधील मुद्देमाल भट्टीत जाळून नष्ट

 पुणे लोहमार्ग पोलीस विभागाने ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई करत गेल्या अनेक वर्षांपासून विविध केसेसमध्ये जप्त केलेले ३८४ किलो २६२ ग्रॅम गांजा आणि ५० ग्रॅम चरस असा एकूण ६ लाख ६० हजार ९७६ रुपयांचा अंमली मुद्देमाल नष्ट केला.

ही कारवाई पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर आणि मिरज येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यांमध्ये १९८१ पासून दाखल १५ गुन्ह्यांतील मुद्देमालावर करण्यात आली. अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. रोहिदास पवार तसेच पोलीस उपअधीक्षक (गृह) इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मुद्देमाल महाराष्ट्र इन्व्हायरो प्रा. लि. कंपनीच्या भट्टीत (Rotary Incinerator) जाळून नष्ट करण्यात आला.

 अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारदर्शक प्रक्रिया:
या कारवाईत रासायनिक विश्लेषक, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तसेच शासकीय वजन व मापन खात्याचे अधिकारी यांच्यासह पंच म्हणून हजर होते. सगळी प्रक्रिया कायद्याने निर्दिष्ट पद्धतीने पार पडली.
प्रत्येक बॅगचे वजन पंचनामा आणि इन्व्हेंट्री पद्धतीने घेण्यात आले आणि नंतर त्या १५ छोट्या बॅग्जमध्ये भरून रोटरी भट्टीत कोळसा आणि विजेरी किरणांच्या सहाय्याने जाळण्यात आल्या.

 उपस्थित अधिकारी व अंमलदार:
ही कारवाई ०९ तास १५ मिनिटांच्या कालावधीत पार पडली. यामध्ये पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ गुरव, पो.उपनिरीक्षक रविंद्र भिडे, आरिफ सय्यद, विनोद घाटे, शरद देसाई तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.
या कार्यवाहीमुळे लोहमार्ग पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधातील कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

 फोटोसोबत अहवाल सादर:
सदर कारवाईचे फोटो पुरावे म्हणून जोडले असून ही कारवाई इतर पोलिस दलांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.