मुंबई आणि उपनगरांमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वादाची ठिणगी पुन्हा एकदा पेटली आहे. गुढीपाडवा शोभायात्रांमध्ये याचे पडसाद उमटले असून, गिरगावमध्ये एका वादग्रस्त फलकावरून हा विषय अधिक चर्चेत आला आहे.
गिरगावमध्ये ‘आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी ताटात काय खायचे हे फक्त आम्हीच ठरवणार’ असा मजकूर असलेला फलक झळकल्याने वाद निर्माण झाला आहे. ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने हा फलक लावत आपली ठाम भूमिका स्पष्ट केली असून, अप्रत्यक्षपणे अमराठी समाजाला इशारा दिल्याचे बोलले जात आहे.
गुढीपाडवा शोभायात्रेत मराठी संस्कृतीचा जल्लोष!
मुंबईत गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गिरगावमध्ये पारंपरिक वेशभूषा, लेझीम पथके, ढोल-ताशा पथकांनी वातावरण दुमदुमून टाकले. यंदा मात्र, मराठी अस्मिता आणि अधिकारांचा मुद्दा चर्चेत राहिला.
या शोभायात्रेत लावण्यात आलेल्या फलकाचा उद्देश स्पष्ट होता – मराठी माणसाने आपल्या संस्कृतीनुसार जगायचे आणि त्यावर कोणाचाही निर्बंध नको! महाराष्ट्रात राहून मराठी समाजावर अटी लादल्या जाणार नाहीत!
मराठींना हक्क नाकारण्याच्या घटनांमुळे संताप!
मुंबईत गेल्या काही वर्षांत मराठी माणसांना घर नाकारण्याच्या आणि त्यांच्या खानपानावर निर्बंध आणण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेषतः जैनबहुल इमारतींमध्ये मांसाहाराचा मुद्दा उपस्थित करून मराठी कुटुंबांना घर भाड्याने देण्यास नकार दिला जातो. यामुळेच मराठी समाजामध्ये नाराजी आहे आणि याच संतापाचा प्रत्यक्ष प्रभाव गुढीपाडवा शोभायात्रेत दिसून आला.
मराठी माणसांना घर नाकारण्यावर कठोर कारवाईची मागणी!
याच मुद्द्यावर ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने काही दिवसांपूर्वी गिरगाव परिसरात एक मोठा फलक लावला होता. या फलकावर ‘मराठी भाषिकांना घर नाकारणाऱ्या विकासकांविरुद्ध कडक कारवाई करा आणि विधानसभेत आवश्यक तो कायदा करा’ अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, संभाव्य वाद टाळण्यासाठी हा फलक लगेच हटवण्यात आला.
राजकीय वातावरण तापले!
मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हा विषय चांगलाच तापला आहे. मराठी विरुद्ध अमराठी हा वाद केवळ भाषेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो रोजगार, घरखरेदी आणि जीवनशैलीवरही परिणाम करत आहे.