कोंढवा, १७ मार्च २०२५ : पुण्यातील कोंढवा परिसरातील एनआयबीएम रोडवरील आरआयएमएस शाळेजवळ पहाटे ४ वाजताच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कारचालकाने आपले वाहनावरील नियंत्रण गमावले आणि डिव्हायडरला धडक दिली. यानंतर सदर चालकाने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सुजुकी बर्गमन या डिलिव्हरी रायडरच्या दुचाकीवर धडक दिली.
या भीषण अपघातामध्ये डिलिव्हरी रायडरची दुचाकी संपूर्णतः चक्काचूर झाली. विशेष म्हणजे दुचाकीवरील सर्व डिलिव्हरी सामानदेखील या अपघातात उद्ध्वस्त झाले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. दरम्यान, अपघातावेळी डिलिव्हरी रायडर काही क्षणांसाठी बाजूला गेला असल्याने तो थोडक्यात बचावला. मात्र, अपघातानंतर डिलिव्हरी रायडरने आपले उपजीविकेचे साधन नष्ट झाल्याचे पाहून मोठा धक्का बसला.
या घटनेनंतर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर राहिल मोहम्मद यांनी ट्विटरवर ट्वीट करत पुणे पोलिसांनी मद्यधुंद वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने पुणेकरांनी पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे,” असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले. त्यांनी या घटनेची व्हिडिओ क्लिपदेखील सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सध्या पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून मद्यधुंद चालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि मद्यधुंद वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.