Home Breaking News छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फूट उंच पुतळा उभारणार – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या...

छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फूट उंच पुतळा उभारणार – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बैठकीत निर्णय

256
0

पिंपरी, पुणे :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत आज विविध महत्त्वपूर्ण निर्णयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. यामध्ये प्रभाग क्र. २ बोऱ्हाडेवाडी, मोशी प्राधिकरण येथे १०० फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासाठी २.५ एकर जागेचा ताबा मंजूर

पेठ क्र. ५ आणि ८ (PIECC) येथील १०,११७.१४ चौरस मीटर (२.५ एकर) जागेचा आगाऊ ताबा छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’ स्मारकासाठी देण्यात आला आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार थोर महापुरुषांचा पुतळा उभारण्याचा अंतिम अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला आहे. त्यामुळे या पुतळ्यास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘एसइइ लर्निंग प्रकल्प’ राबविणार

महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी यासाठी एसइइ लर्निंग प्रकल्प (Socio Emotional and Ethical Learning) राबविण्यात येणार आहे.

या प्रकल्पाच्या अभ्यासदौऱ्यासाठी २० ते २५ शिक्षक, ३ एनजीओ प्रतिनिधी, तसेच शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून ३० जणांचा समावेश असणार आहे. या अभ्यासदौऱ्यातील शिक्षकांची निवड एसइइ लर्निंग मास्टर ट्रेनर म्हणून करण्यात येईल.

महत्त्वाचे विकास निर्णय आणि सुधारणा योजनांनाही मान्यता

सभेत विविध महत्त्वपूर्ण विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • केशवनगर, चिंचवड येथील विद्युत दाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीला मंजुरी

  • महापालिकेच्या सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांच्या स्वच्छता व देखभाल दुरुस्ती खर्चास मंजुरी

  • प्रभाग क्र. २६ येथील कस्पटेवस्ती, कावेरीनगर, वेणूनगर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण (हॉटमिक्स पद्धतीने) करण्यास मंजुरी

  • प्रभाग क्र. २१, पिंपरी येथील फुटपाथ, पावसाळी गटर्स आणि नाल्यांची दुरुस्ती

  • प्रभाग क्र. १०, छत्रपती संभाजीनगर येथील साई उद्यानासाठी टेन्साईल रुफिंग आणि स्थापत्य विषयक कामांना मान्यता

  • प्रभाग क्र. ११, समृद्धी पार्क व शरदनगर परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण व दुरुस्ती

‘स्वच्छ शहर’ उपक्रमांतर्गत सुधारणा योजना

शहरातील वापरात नसलेली, मोडकळीस आलेली किंवा दुरावस्थेत असलेली सार्वजनिक व सामुदायिक शौचालये निष्कासित करण्यासही प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

प्रशासक शेखर सिंह यांची महत्त्वपूर्ण भूमिका

शहराच्या विकासासाठी घेतलेले हे निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.