भक्तिमय विचारधारणेतून संघटित युवा शक्ती, “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने खेड येथील वाडा रोड स्थित एका निराधार निवासी वसतीगृहातील एकूण ५० गरजवंत विद्यार्थ्यांना राजगुरुनगर येथील सत्यम थिएटर्स या चित्रपट गृहामध्ये “हिंदवी स्वराज्य संरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” यांच्या जीवनपटावर आधारित नुकताच प्रसिद्ध झालेला “छावा” या चित्रपटाचा विशेष प्रिमीअर शो आयोजित केला गेला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावरील चित्रीत झालेला इतिहास तसेच स्वराज्य आणि धर्मरक्षणासाठी शंभूराजेंनी दिलेल्या बलिदानाची गाथा या चित्रपटातून नव्या पिढीस पोचती व्हावी या हेतूने या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी हर हर महादेवच्या जयघोषाने चित्रपटगृहात प्रवेश केला. या चित्रपटात प्रदर्शित झालेले धगधगते प्रसंग पाहून विद्यार्थ्यांना गहिवरून आले. महाराजांच्या कर्तुत्वाने प्रेरीत होऊन स्वराज्यासाठी झटलेल्या वीर मावळ्यांचा निष्ठापूर्वक संघर्ष पाहून विद्यार्थ्यांना एक वेगळीच प्रेरणा प्राप्त झाली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना इतिहासातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
ऑल इंडिया मोमेंट फॉर सेवा संस्थेच्या पांगरी, वाडा रोड, राजगुरुनगर येथे निराधार विद्यार्थ्यांचे निवासी वसतिगृह सांभाळणाऱ्या शिक्षक सेवक “श्री. ज्ञानेश्वर बुरकुल” आणि “श्री. गजानन शेळके” यांचा तसेच समिती सदस्यांच्या संकल्पनेतील या विशेष प्रीमियर शोचे आयोजन करण्यास तत्काळ सहकार्य करणाऱ्या सत्यम थिएटरचे संचालक “श्री. विजय (बंटीशेठ) जगदाळे” यांचाही या प्रसंगी समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित मुलांसमवेत समितीचे सदस्य विशाल भांबुरे, विशाल आंब्रे, मनोहर देवकर, सुधीर साकोरे, केतन सांडभोर, सोनल घुमटकर, ओमकार पऱ्हाड यांनीही या विशेष प्रिमीअर शोचा आनंद घेतला.
समितीने आयोजित केलेल्या या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ घेत संस्थेच्या सेवकांनी विद्यार्थ्यांच्या वतीने समितीचे कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही अर्पित केल्या.
सदरील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी चोख पार पाडून समितीचे सदस्य “श्री. मनोज मारुती घुमटकर” आणि “श्री. विजय शिवाजीराव भांबुरे” यांनी या कार्यक्रमास अनमोल सहकार्य लाभलेल्या प्रत्येकाचे तसेच उपस्थितांचे आभार प्रकट केले.