Home Breaking News पुणे पोलिसांची प्रभावी नाकाबंदी : वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई!

पुणे पोलिसांची प्रभावी नाकाबंदी : वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई!

165
0

 पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण शहरभर प्रभावी नाकाबंदी राबविण्यात आली.  ज्यामध्ये शहरातील प्रमुख रस्ते, महत्त्वाचे चौक, रहदारीची ठिकाणे याठिकाणी कसून तपासणी करण्यात आली.

९३ पोलीस अधिकारी आणि १८७२ पोलीस अंमलदारांचा समावेश

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या नेतृत्वाखालील या कारवाईत परिमंडळीय पोलीस उपायुक्त, विभागीय सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखेचे निरीक्षक, वाहतूक शाखा आणि तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचा समावेश होता.

शहरभर ७८ ठिकाणी नाकाबंदी, २८५३ वाहनांची तपासणी

नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण पुणे शहरातील ७८ ठिकाणी कडेकोट तपासणी केली. राँग साईड ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न लावणे अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५१४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७,४६,३५०/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

७२ वाहने ताब्यात, वाहनधारकांमध्ये खळबळ

वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या आणि संशयास्पद वाटणाऱ्या ७२ वाहनांवर पोलिसांनी ताबा मिळवला. वाहनधारकांना नियम पाळण्याचे आवाहन करत पोलिसांनी या कारवाईत शिस्तप्रियतेवर भर दिला.

शिस्तबद्ध वाहतूकसाठी पुणे पोलिसांचे नागरिकांना आवाहन


नाकाबंदीच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले आहे. पोलिसांच्या वतीने “वाहतूक शिस्त राखा, सुरक्षित प्रवास करा” असे आवाहन करण्यात आले आहे.

कारवाईवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही नाकाबंदी आणि कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. सह पोलीस आयुक्त, सर्व अपर पोलीस आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त आणि विभागीय सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे राबविण्यात आली.

वाहतूक नियमांचे पालन करा, सुरक्षित रहा!


पुणे पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, वाहतूक नियमांचे पालन करा, हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करा, ट्रिपल सीट टाळा आणि राँग साईड ड्रायव्हिंग करू नका.