पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांत घडलेल्या सततच्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अखेर ५० हून अधिक घरफोड्या करणाऱ्या एका कुख्यात चोरट्याला जेरबंद करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत.
१७ लाखांच्या मुद्देमालासह अट्टल गुन्हेगाराला अटक
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचत हर्षद गुलाब पवार (वय ३१, रा. गुलाबनगर, घोटावडे फाटा, मुळशी, पुणे) या सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून एकूण १७,०७,००० रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे, ज्यामध्ये –
🔹 २३६.५३ ग्रॅम सोन्याचे दागिने 🔹 २१२ ग्रॅम चांदीचे दागिने 🔹 घरफोडीसाठी वापरण्यात येणारे हत्यारांचे साहित्य
कसा उलगडला गुन्हा?
दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे हे त्यांच्या पथकासह गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील एक संशयित आरोपी म्हसोबा गेट बस स्टॉप (शिवाजीनगर, पुणे) येथे थांबलेला आहे.
सदर माहितीची खातरजमा झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. सापळा रचून आरोपीला रंगेहात अटक करण्यात आले.
गुन्ह्यांची कबुली – अनेक ठिकाणी घरफोड्यांची उकल
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी हर्षद गुलाब पवार याची झडती घेतली असता त्याच्या सॅकमध्ये मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने आणि घरफोडीचे साहित्य आढळले. त्याला अधिक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले असता, त्याने पुणे शहर आणि परिसरातील अनेक ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.
पुणे पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी – नागरिकांचा विश्वास वाढला
शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शिवाजीनगर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
📢 पोलिसांचा इशारा – घरफोडी रोखण्यासाठी अधिक दक्षता घ्या! 🔹 रात्रीच्या वेळी घराच्या मुख्य दाराला अतिरिक्त कुलूप लावा. 🔹 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवा. 🔹 अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवा आणि संशयास्पद हालचाली त्वरित पोलिसांना कळवा.
🔎 पुढील तपास सुरू या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपी हर्षद पवार याने आणखी कोणत्या ठिकाणी गुन्हे केले आहेत, त्याची सखोल चौकशी केली जात आहे.