पुणे शहरातील येरवडा पोलिसांनी अवैध शस्त्रविक्री करणाऱ्या दोन इसमांना अटक करून एक पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले आहे. या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलिसांनी मोठा दणका दिला आहे.
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलिस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलख पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, वाडिया बंगला, येरवडा येथे दोन इसम अवैध पिस्तूल विक्रीसाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळंके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले.
गुप्त माहितीच्या आधारे शस्त्रविक्री रोखली!
सदर ठिकाणी संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांच्याकडे एक ३०,०००/- रुपये किंमतीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. अधिक तपासाअंती या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे निष्पन्न झाले –
1️⃣ प्रविण विकास कसबे (वय २९ वर्षे, रा. आंबेगाव, कात्रज, पुणे)
2️⃣ प्रतिक दादासाहेब रणवरे (वय २५ वर्षे, रा. येवलेवाडी, पुणे)
भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल, आरोपींना अटक
या घटनेबाबत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०४/२०२५ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून मिळालेल्या शस्त्रांचा तपास सुरू आहे. पोलिस तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
अवैध शस्त्र तस्करीविरोधात कठोर कारवाई सुरू!
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पुणे शहरातील अवैध शस्त्र विक्रेत्यांचे नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता आहे. यापूर्वीही पुणे पोलिसांनी अशा अनेक कारवाया करून शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील सुरक्षेचा दर्जा आणखी वाढेल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पोलीस दलाचे विशेष योगदान
या धाडसी कारवाईसाठी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ४) श्री. हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) श्रीमती प्रांजली सोनवणे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती स्वाती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही विशेष कारवाई केली.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, प्रदीप सुर्वे, पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे आणि बालाजी सोगे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
नागरिकांना पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा!
पोलिसांनी नागरिकांना गुन्हेगारी प्रवृत्तींच्या हालचालींबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जर कोणाला अवैध शस्त्रे विक्री किंवा संशयास्पद हालचालींबाबत माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.