पुणे शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करून समाजात भीती आणि दहशत पसरवणाऱ्या व्यक्तींवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही धडक मोहीम हाती घेतली.
📌 गुन्हेगारीच्या महिमा मंडनाविरोधात कठोर पावले!
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विशेषतः इंस्टाग्राम आणि फेसबुकवर गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या. या व्हिडीओंमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचे महिमा मंडन करत, त्यांना “किंग ऑफ पुणे”, “महाराष्ट्राचा बाप” अशा टॅगलाइन देत, त्यांचे समर्थन करणाऱ्या रील्स प्रसारित केल्या जात होत्या. यातून समाजात दहशतीचं वातावरण निर्माण होत असल्याने पोलीस आयुक्तांनी अशा प्रवृत्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
🚔 विशेष तपासानंतर १३ इंस्टाग्राम अकाऊंट्स उघडकीस
पोलीस तपासात हमराज चौक, कोथरूड येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार गजानन मारणेच्या नावाने चालणाऱ्या तब्बल १३ इंस्टाग्राम अकाऊंट्सचा खुलासा झाला. या अकाऊंट्सवरून “KING OF PUNE CITY”, “पुण्याचा बाप कोण आहे?”, “मुंबईत एक दादा, पुण्यात एक फादर” अशा टायटल्ससह गुन्हेगारीचं समर्थन करणाऱ्या पोस्ट्स आणि व्हिडीओ अपलोड करण्यात आले होते.
या रील्समध्ये ड्रोन कॅमेराचा वापर करून गजानन मारणेच्या गाडीच्या ताफ्याचे शूटिंग करण्यात आले होते. याशिवाय, समाजात भीती निर्माण करणारे संवाद आणि धमकीवजा मेसेजेस व्हायरल करून युवकांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण वाढवले जात होते.
🛑 चार आरोपींना अटक!
पोलीस तपासानंतर चार तरुणांची नावे निष्पन्न झाली, ज्यांनी या अकाऊंट्सवरून गुन्हेगारीच्या रील्स अपलोड केल्या होत्या. अटक केलेले आरोपी खालीलप्रमाणे आहेत:
1️⃣ अक्षय निवृत्ती शिंदे (२० वर्षे, निमगाव खालू, श्रीगोंदा, जि. अहमदनगर)
2️⃣ सिद्धार्थ विवेकानंद जाधव (१९ वर्षे, महंमदवाडी, हडपसर, पुणे)
3️⃣ साहिल शादुल शेख (१९ वर्षे, सुंबा, धाराशिव)
4️⃣ इरफान हसन शेख (१९ वर्षे, सुंबा, धाराशिव)
या चौघांना अटक करून कोथरूड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
⚖️ कायदेशीर कारवाई व पुढील पावले
या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत शिंदे यांच्या फिर्यादीवरून कोथरूड पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक १३/२०२५ नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३, ३५३ (१) (ब), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, “सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. कोणीही अशा प्रकारे गुन्हेगारांचा प्रचार करून समाजात भीती पसरवू नये, अन्यथा त्यांना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा केली जाईल.”
✅ मोठ्या पोलिसीय कामगिरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका
ही विशेष मोहीम मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
ही कारवाई खंडणीविरोधी पथक-२, गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, तसेच अंमलदार सैदोबा भोजराव, प्रशांत शिंदे, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, चेतन आपटे, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, चेतन चव्हाण, संग्राम शिनगारे, महिला पोलीस अंमलदार रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांनी केली आहे.
🛑 पोलिसांचा इशारा – गुन्हेगारीला सोशल मीडियावर स्थान नाही!
पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, कोणताही गुन्हेगार किंवा टोळी सोशल मीडियावर महिमा मंडन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यापुढे अशा प्रकारचे गुन्हेगारी रिल्स तयार करणाऱ्या आणि पोस्ट करणाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
✅ सतर्क रहा, सुरक्षित रहा!
✅ गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट्सना थारा देऊ नका!
✅ कोणत्याही संशयास्पद सोशल मीडिया अकाऊंटची माहिती पोलिसांना द्या!