पुणे महानगरपालिकेने भटक्या मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी २०२२ पासून मांजरांची नसबंदी व लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी महापालिकेने मागील तीन वर्षांत तब्बल ९९ लाख ६६ हजार ५०० रुपये खर्च केले आहेत. एका मांजरीच्या नसबंदी प्रक्रियेसाठी ₹१९०० खर्च केला जातो.
महानगरपालिकेच्या युनिव्हर्सल अॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या माध्यमातून ही मोहीम राबविली जाते. भटक्या मांजरांना पकडून नसबंदी केल्यानंतर त्यांना लसीकरण केले जाते व नंतर त्यांना परत त्याच भागात सोडले जाते.
महापालिकेची पहिली मोहीम:
पुणे महानगरपालिका ही राज्यातील पहिली पालिका आहे, ज्यांनी मांजरांची नसबंदी व लसीकरणासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पुणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंदे यांनी सांगितले की, “२०२२ पासून सुरू झालेल्या या मोहिमेमुळे भटक्या मांजरांची संख्या कमी होण्यास मदत होत आहे.”
नसबंदीची आकडेवारी:
- २०२२-२३: १,८०७ मांजरांची नसबंदी
- २०२३-२४: २,८६३ मांजरांची नसबंदी
- २०२४-२५: १,८७२ मांजरांची नसबंदी
महानगरपालिकेचा पुढील उद्देश:
पुणे शहरातील भटक्या प्राण्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी महापालिकेने कुत्र्यांबरोबरच मांजरांच्या नसबंदी मोहिमेतही लक्ष केंद्रित केले आहे. मांजरांना पकडण्यासाठी वाहनांच्या मदतीने संस्था काम करत आहे. मांजरांचे लसीकरण व नसबंदी केल्यानंतर त्यांना परत त्यांच्या मूळ ठिकाणी सोडले जाते.