पुणे: गुंड गजा मारणे उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील्स महागात पडल्या. पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढवणाऱ्या या चित्रफितीमुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे याची तब्बल चार तास चौकशी केली. यावेळी मारणेचे सोशल मीडिया अकाउंट देखील तपासण्यात आले.
गजा मारणे याच्या “GM Boys” या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या साथीदारांनी “गजा मारणे डॉन” व “भाई” अशा प्रकारच्या रील्स पोस्ट केल्या होत्या, ज्यामुळे युवा पिढी गुन्हेगारीकडे आकर्षित होत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मारणेचा दहीहंडी कार्यक्रमादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतरच पोलिसांनी मारणे याला गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलावले.
या चौकशीत मारणेचे साथीदार टिपू पठाण यालाही समाविष्ट करण्यात आले आहे, कारण त्याच्या मदतीनेच मारणे सोशल मीडियावर सक्रिय आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी चार्ज घेतल्यानंतर शहरातील गुंडांना आवर घालण्याची मोहीम हाती घेतली असून, मारणेवर पोलिसांची बारीक नजर आहे.
गजा मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंडांपैकी एक असून, तुरुंगातून सुटल्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला. काही महिन्यांपूर्वी त्याने 300 ते 400 गाड्यांचा ताफा घेऊन जंगी स्वागत केले होते, ज्यामुळे तो चर्चेत होता.