पुणे, ३ सप्टेंबर २०२४: भारतीय हॉकीतील ताज्या कालखंडातील खेळाडूंच्या सहभागासह १८ विभागांचे संघ ४थ्या हॉकी इंडिया सीनियर पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. ही स्पर्धा गुरुवार, ५ सप्टेंबरपासून नेहरुनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू होणार आहे.
ही १०-दिवसीय स्पर्धा रविवारी, १५ सप्टेंबर रोजी त्याच्या अंतिम विजेत्याचा निर्णय देईल. विशेष म्हणजे, ही स्पर्धा हॉकी महाराष्ट्राकडून प्रथमच आयोजित केली जात आहे आणि पुणे हे शहर बेंगळुरू आणि नवी दिल्ली नंतर या स्पर्धेचे यजमानपद मिळविणारे तिसरे शहर ठरले आहे.
पुण्यातील हॉकीप्रेमींसाठी ही स्पर्धा एक आठवड्याचा रोमांचक अनुभव ठरेल, शिवाय या वर्षातील (२०२४) हॉकी महाराष्ट्र आयोजित दुसरी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे. यापूर्वी मार्च २०२४ मध्ये १४वी सीनियर महिला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत विभागीय संघांमधील तीव्र स्पर्धा पाहणे चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरणार आहे, शिवाय भारतीय संघाचे माजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आपली कौशल्ये दाखविण्यास सज्ज आहेत. विशेष म्हणजे, दोन वेळचा विजेता आणि गतविजेता पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड आपला विजेतेपद कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे, तर रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (RSPB) २०२२ च्या विजेतेपदानंतर त्यांच्याशी टक्कर देण्यास तयार आहे.
या स्पर्धेत माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू मुख्य आकर्षण ठरणार आहेत. त्यात टोकियो ऑलिम्पिक्समधील सुरेंदर कुमार, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आकाशदीप, ऑलिम्पियन धर्मवीर आणि दिलप्रीत सिंग यांचा समावेश आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूही आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करतील. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्टार्स युवराज वाल्मिकी, ऑलिम्पियन देविंदर वाल्मिकी, ज्युनियर वर्ल्ड कपपटू आदित्य लालगे, इंडिया कॅम्पर तेरॉन परेरा, अकीब रहीम, प्रताप शिंदे, नियाज रहीम, दर्शन गावकर, अमित गौडा, विक्रम यादव तसेच अजिंक्य जाधव, अनिकेत गुरव यांचा समावेश असेल.
हॉकी महाराष्ट्राकडून ही स्पर्धा पुन्हा एकदा हॉकी प्रेमींसाठी आणि खेळाडूंना उत्कृष्ट खेळाच्या अनुभवाचे व्यासपीठ ठरावी, अशी अपेक्षा आहे.