मुख्य शीर्षक: पंतप्रधान मोदींच्या हस्ते “लखपती दीदी” संमेलनात ११ लाख महिलांना सन्मान, ५००० कोटी रुपयांचे कर्ज वितरण
छत्रपती संभाजीनगर, दि.२५ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी सव्वा ११ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,खासदार संदिपान भुमरे, आमदार संजय शिरसाठ,आमदार प्रशांत बंब,आमदार उदयसिंह राजपूत, आमदार पंकजा मुंढे, खासदार डॉ.भागवत कराड, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,पोलीस आयुक्त प्रविण पवार , जिल्हा पोलीस अधिक्षक विनयकुमार राठोड यांची यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर श्री. मोदी हेलिकॉप्टर ने जळगाव कडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जळगाव, महाराष्ट्र येथे आयोजित “लखपती दीदी संमेलन” मध्ये सहभाग घेतला. या संमेलनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते. संमेलनाच्या वेळी महिलांनी पंतप्रधानांचे आरतीने स्वागत केले.
लखपती दीदी संमेलनात पंतप्रधान मोदींनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात लखपती दीदींच्या श्रेणीत आलेल्या ११ लाख महिलांचा सत्कार केला. या संमेलनात मोदींनी २५०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला, ज्याचा लाभ ४.३ लाख स्वयं-सहायता गटांना मिळणार आहे, ज्यामध्ये सुमारे ४८ लाख सदस्यांचा समावेश आहे.
सरकारच्या मते, “लखपती दीदी” योजना सुरू झाल्यापासून एक कोटी महिला या श्रेणीत दाखल झाल्या आहेत, आणि सरकारचे उद्दिष्ट तीन कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आहे. या योजनेंतर्गत स्वयं-सहायता गटाच्या सदस्यांना वार्षिक एक लाख रुपये कमाईचे लक्ष्य दिले जाते.
पंतप्रधान मोदी यावेळी ५००० कोटी रुपयांच्या बँक कर्जाचेही वितरण करतील, ज्याचा लाभ देशभरातील २.३५ लाख स्वयं-सहायता गटांच्या २५ लाखांहून अधिक सदस्यांना मिळेल.
लखपती दीदी योजना काय आहे?
लखपती दीदी योजना महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आहे. या योजनेद्वारे महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जाते. ही योजना महिलांना आर्थिक स्तरावर मजबूत करण्यासाठी आणि स्वावलंबनाकडे प्रेरित करण्यासाठी आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते, ज्यावर कोणताही व्याजदर लागू होत नाही. म्हणजेच, महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेअंतर्गत व्याजमुक्त कर्ज मिळू शकते.
लखपती दीदी योजनेत अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत. यात आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे फोटो, मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे लागतील.