जळगाव: राज्यातील गुन्हेगारीसह हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जळगाव तालुक्यातील वावडदे ते जळके रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीस्वार आणि पायी चालणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा पिंगळे (वय २०), मयंक चौधरी (वय २१), आदित्य बिऱ्हाडे (वय २०) यांच्यासह जय पाटील (वय २०) आणि लोकेश राजपूत (वय २१) असे पाचजण लाल रंगाच्या कारने (एम एच १५ सीडी ८१९४) पद्मालय येथे गेले होते. परत येताना एका वाहनाला कट लागल्यानंतर घाबरलेल्या चालकाने गाडी वावडद्याच्या दिशेने भरधाव नेली. तिथे कार अडवण्याचा प्रयत्न झाला, मात्र कारने दुचाकी आणि पायी चालणाऱ्या महिलेला उडवून दिले आणि नंतर पलटी झाली.
या अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.