Home Breaking News मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांनी सुचवलं होतं ठिकाण. पण खारघरच्या सेंट्रल पार्कचा प्रस्ताव...

मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांनी सुचवलं होतं ठिकाण. पण खारघरच्या सेंट्रल पार्कचा प्रस्ताव आंदोलकांनी धुडकावला;!!!!!

खारघरचे सेंट्रल पार्क मैदान २९० एकरावर वसले असून आरक्षणासाठी निघालेले लाखोंच्या संख्येने येणारे आंदोलक त्यात सामावू शकतील. शिवाय मुंबईकरांचे हाल होणार नाहीत, असे मत मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना दिलेल्या नोटिशीत म्हटले होते. मात्र, मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक मुंबईतच आंदोलन करण्यावर ठाम आहेत. शिवाय खारघरच्या किती तरी पुढे वाशीतील मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच बाजारपेठांमध्ये आंदोलकाच्या जेवणा-खाण्याच्या तयारीसह राहण्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. यामुळे खारघरला थांबणे संयुक्तित होणार नसल्याचे मतही काही संयोजकांनी व्यक्त केले, तसेच मनोज जरांगेंच्या ताफ्याला पनवेल येथे येण्यास उशीर होत असल्याने तेथे ठेवलेले दुपारचे जेवणाचे साहित्य नवी मुंबईतील बाजार समितीच्या बाजार पेठांत स्थलांतरित करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली होती. मुंबईतील आझाद मैदान हे पाच ते सात हजार लोक मावतील, एवढेच असून शिवाजी पार्क मैदानावर न्यायालयीन आदेशाचे बंधन आहे. यामुळे आपण मुंबईत आंदोलन करण्याऐवजी नवी मुंबईतील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे, हा मुंबई पोलिसांनी दिलेला प्रस्ताव मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी धुडकावला आहे. सर्व कारणे पाहून संयोजकांनी सेंट्रल पार्क येथे आंदोलनास विनम्रपणे नकार दिला आहे. यामुळे मुंबई पोलिसांची डोकेदुखी एकीकडे वाढणार आहे, तर नवी मुंबई पोलिसांची कमी होणार आहे. सेंट्रल पार्कमध्ये सुरू आहे वारकरी संमेलनाची तयारी
मुंबई पोलिसांनी सेंट्रल पार्कमध्ये आंदोलन करण्याची सूचना केली असली तरी तेथे सध्या पुढील आठवड्यात होणाऱ्या वारकरी संमेलनाची जोरदारी तयारी सुरू आहे. या संमेलनासाठी लाखभर लोक येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तेथे स्टेजसह आसन व्यवस्थेची तयारी सध्या सुरू आहे. मराठा आंदोलक तिथे पोहोचल्यास या तयारीस अडथळा निर्माण होऊ शकतो.