पुणे: मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पुणे मेट्रोच्या मंडई स्टेशनच्या ग्राउंड फ्लोअरवर ठेवलेल्या फोम मटेरियलला अचानक आग लागली. आगीमुळे संपूर्ण स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले. पुणे अग्निशमन विभागाने तत्काळ पाच अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले आणि अवघ्या पाच मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
वेल्डिंगदरम्यान लागली आग
प्राथमिक माहितीनुसार, स्टेशनच्या कामादरम्यान वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागली असल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले आहे. वेल्डिंगच्या ठिणग्यांमुळे फोम मटेरियलला आग लागली, ज्यामुळे परिसरात धुराचे मोठे लोट निर्माण झाले. मेट्रो स्टेशन परिसरात आग लागल्याचे लक्षात येताच, स्टेशनवर उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळावरून बाहेर पडून आपली सुरक्षितता सुनिश्चित केली.
तत्काळ प्रतिसादामुळे जीवितहानी टळली
पुणे अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत पाच अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठविल्या. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. संपूर्ण स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला असला तरी, कोणतीही मोठी हानी झाली नाही. मंडई मेट्रो स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी वेळेत दिलेल्या प्रतिसादामुळे आणि अग्निशमन दलाच्या वेगवान कारवाईमुळे जीवितहानी टळली.
आग आटोक्यात; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
आगीमागचे नेमके कारण आणि वेल्डिंग प्रक्रियेदरम्यान सुरक्षिततेचे नियम पाळले गेले होते की नाही, याबाबत अधिक तपास सुरू आहे. पुणे अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग लवकर आटोक्यात आणल्यामुळे मोठी हानी टळली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून संबंधित कामगारांना जबाबदार धरले जाऊ शकते.