भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद आणि त्यासंबंधित कट्टरतावादावर घणाघाती टीका केली आहे. जयशंकर यांनी पाकिस्तानात आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) बैठकीत सामील होत आंतरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानला सुनावले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका करत स्पष्ट केले की, दहशतवाद हा दोन्ही देशांमधील शांतता आणि प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे.
जयशंकर यांनी स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला उद्देशून म्हटले की, “दहशतवादाचा वापर करून व्यापार आणि सहकार्य मजबूत होऊ शकत नाही. शांतता, स्थैर्य आणि परस्पर विश्वास हेच दीर्घकालीन विकासाचे आधारस्तंभ आहेत.” त्यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ माजली आहे, कारण पाकिस्तानमध्ये जाऊन अशा तीव्र शब्दांत टीका करण्याची ही दुर्मिळ घटना आहे.
पाकिस्तानात जाऊन केलेल्या या स्पष्ट आणि दमदार भूमिकेमुळे भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या दौऱ्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे, परंतु पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया आली नाही.
या दौऱ्यामुळे जागतिक पटलावर भारताने आपली आक्रमक आणि स्पष्ट भूमिका सिध्द केली असून, दहशतवादाविरोधात लढण्यास भारत पूर्णपणे कटिबद्ध आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.